
वाळूजमहानगर, (ता.18) – शासनाची कोणतीही परवानगी न घेता, विनापरवाना व बेकायदेशीर रित्या शेतातील माती व वाळूचे अवैध उत्खनन सुरू आहे. उत्खननामुळे जमीन शेती योग्य राहिली नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारी दप्तरी वारंवार अर्ज फाटे करून सुद्धा दखल घेतली जात नाही. असा आरोप परत एका 50 वर्षीय वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.

याबाबत शेतकरी नारायण भाऊराव दाभाडे (50 वर्ष) रा. तुर्काबाद (खराडी) ता. गंगापूर जि. छ. संभाजीनगर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह विविध सरकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, मौजे कसोडा ता. गंगापूर येथील शेत गट नं. 169 मध्ये माझी 2 एकर 19 आर शेतजमिन आहे. या शेतातून बेकायदेशीररित्या वाळू व माती उत्खनन चालु आहे. हे खान अधिनियम 1952 च्या तरतुदीचे सतत उल्लंघन होत आहे. परंतु आपल्या कार्यायाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. मी यापुर्वी तहसिलदार गंगापूर यांना पत्राव्दारे शेतातील बेकायदेशीर उत्खनन बंद करण्यासाठी 4 मार्च 2024 रोजी अर्ज दिला होता. परंतु त्यावर कसलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पुन्हा जिल्हाधिकारी व तहसिलदार तसेच तलाठी यांना 14 मार्च 2024 रोजी स्पीड पोस्टने तक्रारी अर्ज दिला. त्यावर शेतातील बेकायदेशीर होणारे माती व वाळूचे उत्खनन थांबतील, असे वाटले होते. परंतु अद्यापही शेतातील बेकायदेशीर वाळु उत्खनन व माती उत्खनन सुरूच आहे.
या निवेदनात असेही म्हटले आहे की, त्यांच्या शेतातील माती व वाळूचे उत्खनन कैलास देवराव दाभाडे हे करीत असुन त्यावर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. विशेष म्हणजे
या उत्खनन सदंर्भात शासकीय अधिग्रहन किंवा रॉयल्टी किंवा शासनाला मिळत नसून जमिनीची खूप मोठी हानी होत आहे. जमिन उत्खनन होत असल्याने शेतात मोठ मोठे खड्डे पडले असून पिक घेण्यास शेत योग्य राहत नाही. त्यामुळे एकुणच माझा परिवार बेरोजगार झाला आहे. त्यामुळे मला आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी. अशी विनंती वजा मागणी 50 वर्षीय शेतकरी नारायण भाऊराव दाभाडे यांनी केली आहे.
दखल न घेतल्याने मागितली परवानगी –
नारायण दाभाडे यांनी त्यांच्या शेतात सुरू असलेल्या अवैध उत्खननाबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी, पोलीस आयुक्त, तहसील गंगापूर, तलाठी तुर्काबाद आदी ठिकाणी वारंवार तक्रारी केल्या. मात्र एकाही अधिकाऱ्याने दाभाडे यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर वैफल्य आल्याने दाभाडे यांनी आत्मदहन करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्याकडे मागितली आहे.
