
वाळूजमहानगर, (ता.,6) – तात्काळ आणि सहज उपचार मिळावा म्हणून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी केंद्र शासनाची ईएसआयसी ही योजना आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना वाळुज ते चिकलठाणा असा जवळजवळ वीस किलोमीटरचा हेलपाटा मारावा लागतो. त्यामुळे कामगारांचा पैसा आणि वेळ खर्च होऊन हेळसांड ही होत असल्याने वाळूज येथील कामगार वर्गात मोठी नाराजी पसरली आहे.
सध्याचे युग हे यांत्रिक युग आहे. त्यामुळे कामगारांची मोठी गरज आहे. दिवस-रात्र यंत्रावर काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याशी निगडित ई एस आय सी (राज्य कामगार विमा योजना) ही योजना आहे. ज्या कामगारांचा पगार 25 हजाराच्या आत आहे. अशा कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेता येतो. वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगारांची संख्या मोठी आहे. येथील अनेक कामगार ईएसआय धारक आहेत. ही सुविधा मिळवण्यासाठी रुग्णांना प्रथम ईएसआयसी दवाखान्यातून ॲप्रोल (मान्यता) घेणे आवश्यक असते. त्यासाठी वाळूज येथील रुग्णास ईएसआयसी दवाखाना चिखलठाणा एमआयडीसी मध्ये जावे लागते. रुग्णांना तात्काळ उपचाराची गरज असताना ॲप्रोल (मान्यता) घेण्यासाठी वाळूज ते चिकलठाणा असा जवळजवळ 20 किलोमीटरचा हेलपाटा मारावा लागतो. शिवाय वाहतूक कोंडीचा व अन्य जखमीचाही सामना करावा लागतो. शिवाय कामगारांचा पैसा आणि वेळ खर्च होऊन हेळसांड ही होत असल्याने वाळूज येथील कामगार वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. पूर्वी ही सुविधा वाळूज येथे सुरू होती मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या आचारसंहितेमुळे रुग्णांना चिकलठाणा हॉस्पिटलला जावे लागते.

अनिल जाभाडे, संस्थापक अध्यक्ष न्यू पॅंथर कामगार सेना-
यापूर्वी वाळूज औद्योगिक वसाहतीतील रुग्णास ॲप्रोल वाळुज एमआयडीसी मधील टाईप असलेले हॉस्पीटल मध्येच मिळत होते. परंतु नंतर मात्र त्यात बदल केला. त्यामुळे वाळुज एमआयडीसी मधून चिखलठाणा ईएसआय हॉस्पीटलला जावे लागते. व त्यानंतर ईएसआयसी संलग्न असणाऱ्या हॉस्पीटलमध्ये अँडमिट व्हावे लागते. या प्रक्रियेस वेळ लागत असल्याने रुग्णाचा सुद्धा जाण्याची शक्यता असते.

किशोर साळवे, जिल्हाध्यक्ष न्यू पॅंथर कामगार सेना-
वाळुज एमआयडीसी पासून चिखलठाणा हे हॉस्पीटल जवळपास 20 किलो मिटर अंतरावर आहे. त्यात शहरात असणारी वाहनांची गर्दी त्रासदायक ठरते. या गर्दीमुळे अनेकदा ट्राफीक जाम असल्यामुळे रुग्णाला रस्त्यातच अडकून पडावे लागते. व याचा रुग्णास विनाकारण त्रास सहन करावा लागतो.

अमृता डोंगरदिवे, ईएसआयसीधारक कामगार-
वाळूज एमआयडीसी मधील ई एस आय सी धारकांचा एमआयडीसी मधील ई एस आय सी हॉस्पिटलमधील डॉक्टर हे पेशंटला चिकलठाणा हॉस्पिटल येथे पाठवतात. न्यु पँथर कामगार सेनेसह कामगारांचीची मागणी आहे की, पेशंटला येथेच तपासून आणि येथेच पूर्वीप्रमाणेच ॲप्रोल देऊन पेशंटची होत असलेली हेळसांड थांबवावी.
