
वाळूजमहानगर, (ता.4) – मुंजीच्या कार्यक्रमाचे निमीत्त करून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह उरकून घेण्याचा देत चाइल्ड हेल्पलाइन, दामिनी पथक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधवारी (ता.3) सकाळी 11 वाजता उधळून लावला.
घाणेगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा थाटामाटात बालविवाह लावून देण्याची नातेवाईकांकडून तयारी सुरू असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी थेट विवाहस्थळ गाठले. पोलिसांना पाहून नातेवाईकांची एकच धांदल उडाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, मुलाच्या मुंजेचा कार्यक्रम असल्याचे प्रथम सांगण्यात आले. मात्र कसून चौकशी केली असता, धाराशिव येथील मामाच्या 17 वर्षीय मुलीसोबत विवाहाचा बेत असल्याची कबुली नातेवाईकांनी दिली. पोलिसांनी बाल विवाह कायद्याने गुन्हा असल्याची माहिती दिली. त्यावर ‘किमान साखरपुडा तरी करू द्या’ अशी गयावया नातेवाईक करत होते. पोलिसांनी मुलगी 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत असे काही करता येणार नाही. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा दम देताच. नातेवाईक शांत झाले. ही कारवाई एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, चाइल्ड हेल्पलाइनचे सदस्य राजेंद्र सरकटे, दामिनी पथकाच्या लता जाधव, महिला पोलिस कर्मचारी सुरेखा कुकलारे, रूपाली शिंदे, बबलू थोरात यांनी केली.
पालक पुढे आलेच नाहीत –
मुलीच्या पालकांबाबत नातेवाईकांकडे चौकशी केली असता, मुलीचे आई-वडील धारशिव येथेच असल्याचे सांगण्यात आले. तर मुलाच्या आई-वडीलांना हा धक्का सहन होणार नाही. असे सांगत नातेवाईकांनी दोघांच्याही पालकांना पोलिसांपुढे आणलेच नाही. पोलिसांनी मुलीला व नातेवाईकांना दुपारी दोन वाजता बाल कल्याण समितीपुढे हजर केले. त्यासोबतच पालकांना सुचना देवून लेखी घेत, बाल विवाह लावून देण्याबाबत मज्जाव करण्यात आला.
