March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.1) – शेत वस्तीवर गाढ झोपलेल्या मेंढपाळाच्या कुटुंबावर अज्ञात आठ ते नऊ दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करून बेदम मारहाण करीत 1 लाख 17 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. वाळूज परिसरातील येसगाव शिवारात 30 ते 31 मार्चच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेत एक महिला जखमी झाली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी रामकिसन वाघमोडे हे मेंढपाळ येसगाव शिवारातील गट क्रमांक 74 मधील एकनाथ दिवटे यांच्या शेतात कुटुंबासह झोपलेले होते. 30 ते 31 मार्चच्या मध्यरात्री अज्ञात आठ ते नऊ दरोडेखोर हातात लाकडी दांडे, चाकू घेवुन आले. त्यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने मारायला सुरुवात केली. त्यातील काही इसमानी शिवाजी वाघमोडे यांना लाकडी दांड्यानी मारण्यास सुरवात केली ते हिंदी भाषेत बोलत व धमकावत होते. आप के पास जो है वह सब हमे दो ” असे म्हणत त्यातील काही इसमानी शिवाजी वाघमोडे यांच्या पत्नी बनु हिच्या कानातील सोन्याचे कुडुकं व टापसं (टॉप्स) हे ओरबडुन घेत असताना तिच्या कानाला जखम झाली. तसेच तिच्या गळ्यातील मंगळसुत्र बळजबरीने हिसकावुन घेतले. त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असलेल्या इतर महिलांच्या कानातील सोन्याचे कुडुके व गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने हिसकावुन घेतले. तसेच लक्ष्मण काळे याचे गळ्यातील सोन्याचा ओम व कानातील सोन्याची बाळी बळजबरीने हिसकावुन घेत असताना विरोध केल्याने त्याला त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने मारले. तसेच शिवाजी वाघमोडे यांच्या पायावर त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने मारुन चाकुचा धाक दाखवुन पॉकेटमधिल रोख रक्कम 60 हजार रुपये काढुन घेतले. आणि अंधाराचा फायदा घेत घेत पळून गेले. यावेळी दरोडेखोरांनी 12 हजार रुपये किंमतीचे 4 ग्रॅम सोन्याचे कुडुके, 30 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्रे, 6 हजार रुपये किंमतीचे 2 ग्रॅम सोन्याचे कानातील टॉप्स, 9 हजार रुपये किंमतीचे 1.5 ग्रॅम सोन्याची बाळी व 1.5 ग्रॅम सोन्याचा ओम तसेच पाकीटातील 60 हजार रुपये रोख रक्कम असे मिळून एकुण 1 लाख 17 हजार रुपये किंमतीची रोख रक्कम व दागिणे बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला.

या दरोड्याची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, उपनिरीक्षक रमेश राठोड पोलीस अंमलदार सतीश हंबर्डे, गणेश लकस आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र तोपर्यंत दरोडेखोर फरार झाले होते.
या प्रकरणी शिवाजी वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश राठोड करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *