
वाळुज महानगर – वाहनधारकांचा प्रवास गतिमान, सुरक्षित व सुरळीत व्हावा. कोणताही अपघात होऊन वाहनधारकांचा बळी जाऊ नये. यासाठी रस्ते विभागाच्या वतीने अनेक प्रयत्न केल्या जात आहे. मात्र त्याला छेद देण्याचा प्रकार वाळूज औद्योगिक वसाहतीत सर्रास पहावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा महामार्ग अतिशय वर्दळीचा आहे. या महामार्गावरून रात्रंदिवस असंख्य वाहने धावतात. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे यांच्यासह मराठवाड्यातील अनेक औद्योगिक वसाहती या महामार्गाने जोडल्या आहेत. त्यामुळे कारखान्यातून निघणाऱ्या उत्पन्नाची याच महामार्गाने वाहतूक करण्यात येते. रस्ते विभागाच्या वतीने या महामार्गावरील अपघात कमी व्हावे. वाहनधारकांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा. यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहे.
मात्र या महामार्गावर वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकाजवळ दुर्गंधीयुक्त सांडपाण्याची मोठे डबके पडले असल्याने या ठिकाणी दररोज लहान मोठे अपघात होतात. त्यात अनेकांचे जीव गेले असून कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे. विशेष म्हणजे सांडपाण्याच्या डब्यात केरकचराकुजल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याबाबत जागतिक बँक प्रकल्पाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी 3 नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंता, एम.आय.डी.सी. (MIDC), वाळुज, संभाजीनगर यांना निवेदन देऊन वाळुज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकाजवळ साचणाऱ्या पाण्याचा निचरा होऊन रस्ता व होणारे अपघात रोखण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी.
एम.आय.डी.सी. वाळुज अंतर्गत येणाऱ्या कामगार चौकात परिसरातील साचणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी सतत पाणी साचत असल्यामुळे रस्ता खराब होऊन खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनचालकांचे व नागरिकांचे वारंवार अपघात होत आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने तिथे पाणी साचून राहत आहे. पुढे पाणी वाहून जाण्यास वाट मिळत नसल्यामुळे रस्त्यावर मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन, कामगार चौकाजवळील रस्त्यावरील पाण्याचा योग्य व लवकरात लवकर जलनिस्सारण (पाण्याचा निचरा) होण्यासाठी योग्य ती तांत्रिक व्यवस्था करण्यात यावी. अशी विनंती वजा मागणी करण्यात आली आहे.
