वाळूजमहानगर, (ता.02) – वाळूज परिसरातील गरवारे कंपनीच्या समोर असलेल्या मिठे वस्ती परिसरात रिलायन्स कंपनीच्या गोडाऊन समोर एका 40 वर्षीय ट्रक चालकाचा मृतदेह सोमवारी (ता.2) रोजी दुपारी आढळून आला. मात्र या ट्रक चालकाचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला की, त्याचा घातपात करण्यात आला. याचे गुड गुलदस्त्यात असून ते शव-विच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
वाळुज जवळील गरवारे कंपनी समोर नगर औरंगाबाद रोडच्या पूर्वेस मीठे वस्ती आहे. या परिसरात वेगवेगळ्या कंपनीचे अनेक गोडाऊन आहेत. त्यातच गट क्रमांक 2 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक गोडाऊन आहे. रविवारी (ता.1) रोजी ट्रक (जी जे 19 एक्स – 65 59) चा चालक लक्ष्मण उत्तम पाटील (वय 40) रा. शेवगे (प्रगणी बहाळ) ता. पारोळा जि. जळगाव हा गुजरात येथून (पेठ) प्लास्टिक दाना हे मटेरियल घेऊन वाळूज येथे आला होता. रात्रभर तो ट्रक मध्येच झोपला. सोमवारी (ता.2) सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याने रिलायन्स गोडाऊन समोर ट्रक खाली करण्यासाठी लावला. ट्रक खाली करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच लक्ष्मण पाटील याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे या घटनेची माहिती पोलिसांना न देता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या गोडाऊनचा व्यवस्थापक सोमीनाथ बापूराव शिंदे यांनी परस्पर रुग्णवाहिका बोलून मृतदेह घाटीत घेऊन जाण्याचे सांगितले.
मात्र पोलीस आल्याशिवाय व पंचनामा झाल्याशिवाय मृतदेह घेऊन जाण्यास रुग्णवाहिका चालकाने नकार दिला. दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक पत्रकारांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाळूज पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण बुट्टे व कारभारी देवरे यांनी पंचनामा करून मृतदेह घाटीत रवाना केला. या घटनेची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र उत्तम पाटील या ट्रक चालकाचा मृतदेह नेमका कोणत्या कारणाने झाला. याचे गुढ अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्याचे शेव विच्छेदन झाल्यानंतरच हा नैसर्गिक मृत्यू आहे की, त्याचा घातपात करण्यात आला. हे स्पष्ट होणार आहे.
