वाळूजमहानगर, (ता.18) – वाळुज परिसरातील करोडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी (ता.18) रोजी घेण्यात आलेल्या मतदानात 1 हजार 20 मतदारांपैकी 978 महिला पुरुषांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला. त्यामुळे येथील टक्केवारी शंभराच्या आसपास गेली असून येथे अत्यंत शांततेत मतदान झाले. येथील सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. शिवाय ते जनतेतून निवडल्या जाणार असल्याने येथे चांगलीच चुरस निर्माण झाली.
वाळूज परिसरातील करोडी येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. नव्याने स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीत तीन वार्ड मधून 7 ग्रामपंचायत सदस्य निवडून जाणार आहे. या 7 जागेसाठी सर्व धर्म समभाव ग्रामविकास पॅनल व जय शिवशंभो ग्राम नवनिर्माण पॅनल असे दोन पॅनलचे प्रत्येकी एक प्रमाणे 14 उमेदवार व वार्ड क्रमांक दोन मधून एक अपक्ष उमेदवार असे एकूण 15 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. तर सरपंच पदासाठी दोन्ही पॅनलचे प्रत्येकी एक व अपक्ष एक असे एकूण तीन महिला उमेदवार होते. करोडी येथील मतदार संख्या 1 हजार 20 आहे. या ग्रामपंचायत साठी मतदान प्रक्रिया रविवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या दरम्यान राबविण्यात आली. या निवडणुकीसाठी तीन बूथ तयार करण्यात आले होते. त्यानुसार बूथ क्रमांक एक येथे एकूण 403 मतदानापैकी 383 जणांनी मतदान केले. बुथ क्रमांक दोन वर 310 मतदारांपैकी 298 तर बुध क्रमांक तीनवर एकूण 307 मतदारांपैकी 297 मतदारांनी मतदानचा हक्क बजावला.
दोन पॅनल मध्ये चुरस –
वाळूज परिसरातील करोडी ग्रामपंचायत अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाते. येथील ग्रामपंचायतची सत्ता ताब्यात घेण्यासाठी सर्वधर्मसमभाव ग्रामविकास पॅनल व जय शिवशंभो ग्राम नवनिर्माण पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. शिवाय येथील जनतेतून सरपंचपद निवड असल्याने ही निवडणूक अत्यंत अटीतटी प्रतिष्ठेची झाली. मात्र दोन्ही पॅनल मध्ये ही निवडणूक होत असताना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली अत्यंत शांततेत झालेल्या या निवडणुकीदरम्यान दौलताबाद पोलीस ठाण्याच्या वतीने करोडी येथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
