
वाळूज महानगर :- शालेय स्तरावरील क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या बहुप्रतिक्षित लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. ही स्पर्धा येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून शहरातील एडीसीए आणि देवगिरी कॉलेज मैदानावर हे सर्व सामने खेळवले जाणार आहेत.
या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असून, प्राथमिक फेरीत प्रत्येक सहभागी संघाला किमान ४ लीग सामने खेळण्याची संधी मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर यांनी दिली. औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष लोळगे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांचे चिरंजीव विशाल लोळगे यांनी तसेच त्यांच्या कुटुबियांनी पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला भारताचा दिग्गज माजी अष्टपैलू क्रिकेटपटू करसन घावरी आणि सीएसएमआरडीएच्या सहआयुक्त अंजली धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सचिव शिरीष बोराळकर यांनी दिली.
स्पर्धेची खास वैशिष्ट्ये : स्पर्धेचे स्वरूप व संघ रचना
या स्पर्धेत एकूण २० नामांकित शाळांचे संघ सहभागी होत आहेत. या सर्व संघांची अ, ब, क आणि ड अशा चार मुख्य गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटात ५ संघांचा समावेश आहे.
प्रत्येक संघाला ४ साखळी सामने
सर्वसाधारण बाद (नॉकआऊट) पद्धतीमुळे पहिल्याच सामन्यात पराभूत होणाऱ्या संघांना बाहेर पडावे लागते. मात्र, या स्पर्धेत खेळाडूंना भरपूर अनुभव आणि संधी मिळावी म्हणून ‘राउंड रॉबिन’ लीग पद्धत अवलंबण्यात आली आहे. यामुळे साखळी फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील उर्वरित चारही संघांविरुद्ध प्रत्येकी १ अशा प्रकारे तब्बल ४ साखळी सामने खेळणार आहे.
एकूण ४३ लढतींचा थरार –
साखळी फेरीत १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान एकूण ४० सामने पार पडतील. त्यानंतर चारही गटांतील अव्वल (विजेता) संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील. २६ सप्टेंबर रोजी दोन्ही उपांत्य सामने (सेमीफायनल), तर २७ सप्टेंबर रोजी एडीसीए मैदानावर अंतिम सामना रंगणार आहे.
उद्घाटन लढत –
स्पर्धेची सलामीची लढत १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता एडीसीए मैदानावर ग्रुप ‘ड’ मधील एसएफएस हायस्कूल विरुद्ध गायकवाड ग्लोबल स्कूल यांच्यात रंगणार आहे. दररोज दोन्ही मैदानांवर मिळून सकाळी ८.००, ११.०० आणि दुपारी २.०० वाजता अशा तीन सत्रांत सामने खेळवले जातील.
शालेय स्तरावर दर्जेदार खेळपट्टी आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळाल्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंमधील गुणवत्ता समोर येण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास सचिव शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला आहे. क्रीडारसिकांनी या शालेय क्रिकेट कुंभाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही संघटनेतर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राहुल टेकाळे यांच्यावर स्पर्धा आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गटनिहाय सहभागी २० संघ –
ग्रुप अ – द वर्ल्ड स्कूल, नॅशनल इंग्लिश स्कूल, एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल, नाथ व्हॅली स्कूल, चाटे स्कूल.
ग्रुप ब – स्टेपिंग स्टोन हायस्कूल, होलीक्रॉस इंग्लिश स्कूल, केंब्रिज स्कूल, एचएपी इंटरनॅशनल स्कूल, राजा शिवाजी विद्यालय.
ग्रुप क – सीएसएन इंटरनॅशनल स्कूल, वूडरिज स्कूल, लिटल फ्लॉवर हायस्कूल, एसबी हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल.
ग्रुप ड – एसएफएस हायस्कूल, गायकवाड ग्लोबल स्कूल, देवगिरी ग्लोबल ॲकॅडमी, आरजे इंटरनॅशनल स्कूल, लिटल एंजल स्कूल.
