
वाळूज महानगर, (ता.14) – वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर मधील 27 वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी 13 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान पल्लवीकडून वेळोवेळी पैसे घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मथुरानगर, गट नं. 7, वडगाव कोल्हाटी यांची मोठी मुलगी पल्लवीचे पहिले लग्न 2015 मध्ये मदन जगताप रा. पोखरी ता. परतुर जि. जालना यांच्या सोबत झाला होता. त्यांच्या पासुन तीला सहा वर्षाची इंद्रायणी नावाची मुलगी आहे. मदन जगताप हे 2021 मध्ये अपघातात मयत झाले आहेत. तेव्हा पासुन पल्लवी माहेरी राहत होती. दरम्यान पल्लवीचे 12 जुलै 2024 रोजी गोपाल सहाने रा. कुंभारी ता. भोकरदन जि. जालना (ह.मु. गट नं. 5, स्वास्तिक सिटी, वडगाव कोल्हाटी) याच्यासोबत रजिस्टर लग्न झाले. लग्नात 3 लाख रुपये हुंडा व 5 ग्रम सोन्याची अंगठी दिली. तेव्हा पासुन पल्लवी व तिची मुलगी इंद्रायणी गोपाल सहाने याच्या सोबत राहत होती. सुरवातीला काही दिवस गोपाल सहाने याने पल्लवीला चांगली वागणुक दिली. गोपाल सहाने याच्या पासुन पल्लवीस दिवस गेले असून ती 6 महिण्याची गरोदर होती. सप्टेंबर 2024 पहिल्या पतीचे अपघाताचा विमा मंजुर झाल्याने पल्लवीला 80 लाख रुपये मिळाले. पल्लवीजवळ पैसे आल्याचे गोपाल सहानेला माहीत झाल्याने त्याने पल्लवीकडून ट्रक्टर घेण्यासाठी सुरवातीला 2 लाख रुपये, त्यानंतर कार खरेदीसाठी पल्लवी कडुन 9 लाख रुपये घेतले. त्यानंतर गोपाल सहाने याने नविन घर खरेदीसाठी पल्लवीकडे पैशाची मागणी करण्यास सुरवात केली. त्यावेळी पल्लवी व माहेरकडील मंडळींनी जावाई गोपाल सहानेला सांगितले की, तुम्हाला एक घर असतांना दुसरे घर कशासाठी घ्यायचे?. असे विचारले. परंतु गोपाल सहाने याने पल्लवीकडे सतत पैशाची मागणी करुन तिला माराहण करत होता. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर पल्लवीने घर खरेदीसाठी पैसे देण्याचे ठरवले. आणि तीच्या बँक खात्यातुन अंदाजे 30 ते 35 लाख रुपये दिले. परंतु गोपाल सहाने व त्याच्या कुटुंबातील लोकांनी पल्लवीकडून पैसे काढण्यासाठी सतत त्रास देण्यास सुरवात केली. त्यानंतर पल्लवीची नंनद सिमा अंबादास सहाने हिच्या लग्नासाठी परत पल्लवीकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी पल्लवीने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर पल्लवीचा पती गोपाल सहाने, नंनद कविता कैलास चिकटे, नंनद अर्चना किशोर जाधव, नंदई किशोर जाधव व दिर समाधान अंबादास सहाने या सर्वानी मिळुन पल्लवीकडे नंनद सिमा अंबादास सहाने हिच्या लग्नासाठी 20 लाख रुपयेची मागणी केली. परंतु पल्लवीने पैसे देण्यास नकार दिल्याने तिचा सर्वांनी मानसिक व शारिरीक छळ करुन तिला 10 लाख रुपये देण्यास भाग पाडल्याने पल्लवी हिने त्यांना 10 लाख रुपये दिले. परंतु, एवढे होवुन सुद्धा त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी परत ननंद अर्जना जाधव व तिचा पती किशोर जाधव यांचे घर बांधकाम करण्यासाठी परत तिच्याकडे 20 लाख रुपयाची मागणी केली. परंतु पल्लवी हिची त्यांना पैसे देण्याची मानसिकता नसल्याने नंनद अर्चना जाधव व तिचा पती किशोर जाधव यांनी मानसिक व शारीरीक छळ करुन तिच्याकडुन 20 लाख रुपये घेतले. या काळात पल्लवीची मुलगी इंद्रायणी जगताप ही आधुनमधुन गोदावरी परमेश्वर घोपटे यांच्याकडे येत असल्याने ती त्यांना नेहमी सांगत असत की, पप्पा हे मम्मीला नेहमी मारहाण करतात. तसेच सोमवारी 12 जानेवारी रोजी पल्लवीचा पती गोपाल सहाने याने पल्लवीस हाताचापटाने मारहाण केली होती. व मंगळवारी 13 जानेवारी रोजी पल्लवीची मुलगी इंद्रायणी हिस नंनद अर्चना जाधव व नंदई किशोर जाधव यांनी सकाळी सोबत घेवुन गेले होते. त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास इंद्रायणीचा चुलता समाधान सहाने याने गोदावरी घोपटे यांच्या ताब्यात दिली. दरम्यान पल्लवी हिने मंगळवारी 13 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने राहते घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. ती 6 महिन्याची गरोदर होती. याप्रकरणी पल्लवीची आई गोदावरी परमेश्वर घोपटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
——————–
