वाळूज महानगर, (ता.13) – कै.तेजरावजी पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलचे 18 वे वार्षिक स्नेहसंमेलन संत एकनाथ रंगमंदिर, उस्मानपुरा या ठिकाणी उत्साहात पार पडले.
वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे, आठवणींचा ठेवा जपणारे, एक अविस्मरणीय आठवण अशाच रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल चे स्नेहसंमेलन प्रथम प्रतिमापूजन व दीप-प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रवक्ते श्री.प्रदीप दादा साळुंके, संजनाताई जाधव(आमदार कन्नड), यांच्या हस्ते पार पडले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उबाठा शिवसेने चे श्री. बाळासाहेब थोरात, भाजपचे सदस्य श्री.भरतसिंह राजपूत, संस्थेचे अध्यक्ष श्री.सुभाष निकम,उपाध्यक्ष जिजाबाई निकम, सचिव अरुण निकम, दिपाली निकम, मुख्याध्यापक अतुल निकम,स्वाती निकम, उप मुख्याध्यापक संदीप चव्हाण, रोहिणी जगदाळे, उर्मिला चव्हाण आदी शिक्षण,राजकीय सांस्कृतिक, क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका रोहिणी जगदाळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गतवर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलनात मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली व शाळेने शैक्षणिक वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
अध्यक्षस्थानी असलेल्या श्री.सुभाष निकम सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला कशी चालना मिळते, हे सांगितले. शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर,नृत्य कलाविष्कार सादर केले.चिमुकल्यांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनीच विविध देशभक्तीपर, विनोदी आणि सांस्कृतिक नृत्ये सादर केली. पारंपरिक वेशभूषा आणि आधुनिक नृत्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या “छावा” नाटकातील सादरीकरण हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.या संमेलनात पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच ज्यांना संमेलन हे प्रत्यक्ष पाहता आले नाही त्यांच्यासाठी शाळेद्वारे लाईव्ह प्रक्षेपण हे यूट्यूब च्या माध्यमातून दाखवण्यात आले. वार्षिकसंमेलन हे यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम केले.
कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रगीताने करण्यात आला तसेच सर्व विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे शिक्षिका मयुरी अंभोरे यांनी आभार मानले. हे स्नेहसंमेलन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरले, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
