
वाळुज महानगर, (ता.12) – जिजाऊ जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने गट नंबर मधील ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलमध्ये जिजाऊ जन्मोत्सव सोहळा अतिशय दिमाखात सोमवारी 12 जानेवारी रोजी सकाळी साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेचे संचालक उमेश दुधाट पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी “जय जिजाऊ, जय शिवराय” असा जयघोष करत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.

कार्यक्रमाची सुरुवात गट नंबर परिसरात प्रभातफेरी काढून करण्यात आली. या प्रभातफेरीद्वारे विद्यार्थ्यांनी माँ साहेब जिजाऊ यांच्या कार्याची, विचारांची व संस्कारांची माहिती घरोघरी पोहोचवली. 
यामुळे परिसरात उत्साहाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर शिवराणा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून तसेच माँ साहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. शिवराणा चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक स्थळी विद्यार्थ्यांनी नृत्य व नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून माँ साहेब जिजाऊ यांच्या महान कार्याचा प्रभावी परिचय उपस्थितांना करून दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता शिवले यांच्यासह गीतांजली राऊत, शीतल शेंडे, सविता सूर्यवंशी, कविता उचाळ यांनी अथक परिश्रम घेतले.
