वाळूज महानगर, (ता.10) – लोम्बकळलेल्या विद्युत तारांबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदन देऊनसुद्धा दखल न घेतल्याने 14 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला. हा प्रकार बेजबाबदारीमुळे घडल्याचा ठपका ठेवत संतप्त गावकऱ्यांनी मोर्चा काढून महावितरण विरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे अखेर तुर्काबाद येथील इंजिनिअर व वायरमन विरोधात शुक्रवारी नऊ जानेवारी रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तुर्काबाद (खराडी) येथील अंकुश कचरू जाधव यांच्या शेत गट नं.304 येथे लोंबकळत असलेल्या विद्युत प्रवाहाची 11 केव्ही विद्युत ताराबाबत अर्ज देवून व वेळोवेळी तोंडी सांगून सुध्दा तुर्काबाद येथील महावितरण कार्यालयाचे इंजिनिअर मुफिक शेख व वायरमन चंदन भोकरे यांनी अंकुश जाधव यांच्या शेतातील लटकत असलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या विद्युत तारांकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे व हलगर्जीपणाने काम केले नाही. म्हणून जाधव यांचा मुलगा ओंकार अंकुश जाधव वय 14 वर्षे याला मंगळवारी 6 जानेवारी रोजी सकाळी शॉक लागून त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी अंकुश कचरु जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी इंजिनिअर मुफिक शेख व वायरमन चंदन भोकरे यांच्या विरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात कलम 106(1), 3(5) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळुज पोलिसांनी घेतली दखल –
तुर्काबाद (खराडी) येथील महावितरणचे इंजिनियर शेख व वायरमन भोकरे यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा ठपका ठेवत गावकऱ्यांनी शुक्रवारी 9 जानेवारी रोजी तुर्काबाद येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून ताशेरे ओढले होते. यावेळी परिस्थिती ज्यांनी पुरावा व गावकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी या प्रकरणाची दखल घेत गावकऱ्यांच्या भावना समजून घेण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांची फोनवरून चर्चा चर्चा केली.
