
वाळूज महानगर (ता.8) – शेजारी शेजारी बसून भाजीपाला विक्री करीत असताना दोन विक्रेत्यांमध्ये राडा होऊन शिवीगाळ करत एकाला चाकूने भोसकले तर दुसऱ्याला सिमेंटच्या गट्टू ने जबर मारहाण करण्यात आली. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.
याबाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पराविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीत सुरडकर यांनी म्हटले आहे की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील जोगेश्वरीकडे जाणाऱ्या रोडवर भाजी मंडई भरते. या भाजी मंडईत नारायण प्रल्हाद सुरडकर रा.रांजणगाव ( शेणपुंजी) व फहीम हकिम शेख रा.आंबेडकरनगर जोेगेश्वरी हे दोघेही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दोघांच्या दुकाना जवळजवळ आहेत. गुरूवारी 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास भाजीपाला विक्री करत असतांना, बटाटे विक्रीच्या दरावरून फहीम हा नारायण सुरडकरच्या पत्नी व मुलीला शिवीगाळ करत होता. त्यावेळी सुरडकर याने त्यास जाब विचारला असता फहीमने तुला येथे राहायचे की नाही, असे म्हणत तुला आज संपुन टाकतो. अशी धमकी देत दुकानातील भाजीपाला विक्रीचा चाकूू काढून सुरडकर याच्या पोटात खुपसला. पुन्हा तो चाकू मारणार त्याचवेळी सुरडकर याने हात पुढे केल्याने चाकूचा वार हातावर लागला. त्यामुळे सुरडकर हा खाली बसला असता फहीम शेख याने पुन्हा सुरडकर यांच्या डोक्यात वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यास गंभीर जखमी अवस्थेत खाजगी रूग्णालायत दाखल केले. या प्रकरणी फहीम शेख यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास सपोनि नरेश ठाकरे करीत आहे.
तर फहीम शेख यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, फहीम हा 25 रुपये दराने बटाटे विक्री करत होता. त्यावेळी शेजारी असलेला सुरडकर तुझ्यात हिमत असे तर 20रुपये दराने बटाटे विक्री करून दाखव असे म्हणाला. यावेळी त्यांच्यात वाद होऊन शिवीगाळ झाली. त्यावेळी फहीम हा सुरडकर यास समजावून सांगत असतांना, त्याने सिमेंट कॉक्रेटचा गट्टु उचलून फहीमला मारहाण केली. या प्रकरणी दोघांच्याही फिर्यादीवरून परस्परांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. रावासाहेब काकड करीत आहे.
