
वाळूज महानगर (ता.8) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष कुंदन लाटे यांच्यावर जीव घेण्याचा प्रयत्न झाला. साउथ सिटी सिडको वाळुजमहानगर -2 परिसरात 7 नोव्हेंबरच्या पहाटे झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाईच्या वतीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी निदर्शने करत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत रिपाईच्या वतीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कुंदन लाटे हे जालन्यातील बैठक आटोपून घरी परतत असताना त्यांच्या फॉर्च्युनर गाडीवर अज्ञात इसमांनी हल्ला केला. त्यावेळी गाडीत जिल्हाध्यक्ष बालकृष्ण इंगळे हे देखील होते. साउथ सिटी प्रवेशद्वारावर प्रथम गाडी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रसंगावधान राखत चालकाने गाडी पुढे घेतली. पुढे मधल्या रस्त्यात दोन संशयित व्यक्ती गाडीसमोर आल्या असून, त्यांच्या हातात बंदूक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गाडीवर दगडफेक करून हल्ला करण्यात आला, यात वाहनाचे नुकसान झाले. या घटनेनंतर शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी दुपारी आर.पी.आय. (आठवले गटाचे) कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, दीपक निकाळजे, संजय ठोकळ, बाळकृष्ण इंगळे, सुखदेव सोनवणे, गौतम मोरे, चेतन सोनवणे, काका कोळसे, शरद कीर्तीकर, भीमराव मोरे, विशाल काळे आदींची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे हे स्वतः ठाण्याबाहेर आले व त्यांनी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
