
वाळूज महानगर :- गेवराई ब्र. येथील जिल्हा परिषद शाळेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्य विद्या रमेश गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास आणि स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विद्या रमेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि संघर्ष हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी या इतिहासाचा अभ्यास करून देशाच्या विकासात योगदान देण्याची भावना मनात जोपासावी. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक घडविणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे.” तसेच गेवराई ब्र. येथील जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी, विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शाळेच्या भौतिक विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
