March 23, 2026

वाळुज महानगर,( ता 28) – बिअरची वाहतूक करणारा कंटेनर वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील फाट्यावर उलटला. या अपघातात कंटेनर चालक जखमी होऊन केबिनमध्ये अडकला. तो मदतीसाठी विव्हळत होता. मात्र त्याला मदत करण्याऐवजी प्रत्यक्षदर्शींनी बिअरची लुटालुट केली. या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळुज औद्योगिक वसाहतीतील लीलासन या बियरचे उत्पादन करणाऱ्या कंपनीतून रुबी ट्रान्सपोर्टच्या वतीने टूबर्ग बियरच्या काचेच्या बॉटल आणि टीन पॅक बियर असे जवळजवळ दोन हजार बॉक्स घेऊन कंटेनर (एम एच 26, एडी 1006) जळगाव येथे जात होता.

मात्र हा कंटेनर रांजणगाव (शेणपुंजी) येथील धनुष्यबाणाच्या कमानी जवळ येताच दुभाजकाला धडकून उलटला. सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात कंटेनर चालक सय्यद अब्दुल्ला सय्यद हुसेन (वय 30) रा. अजिंठा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर हा जखमी होऊन कंटेनरच्या केबिनमध्ये अडकून पडला. तो मदतीसाठी विव्हळत असताना त्याला मदत करण्याऐवजी प्रत्यक्षदर्शी लोकांनी बियरची लुटालूट केली. या अपघाताची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे व वाळुज वाहतूक शाखेचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. दरम्यान दोन ते अडीच तास वाहतूक ठप्प झाल्याने ही वाहतूक कोंडी सोडवता सोडवता पोलिसांच्या नाकीनऊ आले. रांजणगाव येथील सरपंच बाबुराव हिवाळे व त्यांचे सहकारी तसेच अपघात मदतनीस मनोज जैन व अन्य पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

 

पोलिसांना न जुमानता बिअरची लुटालुट –
या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र बिअरच्या बाटल्या व बॉक्स पसरल्याने प्रत्यक्षदर्शी लोकांनी बियर बाटल्यांची लुटालुट सुरू केली. पोलिसांनाही न जुमानता अनेकांनी बियरचे बॉक्स लंपास केले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला. मात्र तरीही हातातला बियरचा बॉक्स सुटत नव्हता.

 

अडीच तास वाहतूक ठप्प –
रांजणगाव फाट्यावरील वळणावर बियरचा कंटेनर उलटल्याने त्यातील बियरचे बॉक्स सर्वत्र विखुरले होते. तसेच अनेक बाटल्या फुटून रस्त्यावर काचाच काचा झाल्या होत्या. या बाटल्यांमधील बियर व कंटेनर मधील डिझेल एकत्र होऊन रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे जवळजवळ अडीच तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रस्त्यावरून वाहिली बियर –
अपघातानंतर बाटल्या फुटल्याने त्यातील बियर अक्षरशः पाण्यासारखी रस्त्यावरून वाहिली. शिवाय कंटेनर उलटल्याने त्यातील डिझेल रस्त्यावर पसरले. त्यामुळे सर्वत्र उग्र वास सुटला होता.

 

जेसीबी मशीनची घेतली मदत –
दरम्यान बाटल्या फुटून रस्त्यावर काचेचा खच झाला होता. जेसीबी मशीनची मदत घेऊन सर्व काचा बाजूला करण्यात आल्या. त्यानंतर वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून रस्त्यावर पसरलेली बियर व डिझेल काढून टाकले. रात्री 20 वाजे नंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

 

वाहनधारक त्रस्त –
या अपघातानंतर कंटेनर रस्त्यात उलटला त्यामुळे दुभाजकाच्या विरुद्ध बाजूने त्यातील बियर चे बॉक्स विखुरले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने पोलिसांनी रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक वळवली. मात्र तरीही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने त्यातून वाट काढताना वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *