
वाळूज महानगर (ता.15) :- राज्य आणि केंद्र सरकारच्या मान्यतेमुळे शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. मात्र त्यास काही धर्मांध समाजाने विरोध दर्शवला आहे. हा विरोध हाणून पाडण्यासाठी बजाजनगरात सकल हिंदू एकत्रिकरण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हिंदू समाज बांधवांनी एकतेची वज्रमूठ आवळत “होय छत्रपती संभाजीनगरच पाहिजे” असे घोषणापत्र भरून त्यावर स्वाक्षरी करून समर्थन देण्याचा संकल्प बुधवारी (ता.14) रोजी केला.
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे. या मागणीसाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. आघाडी सरकारने जाता जाता या नामकरणाचा निर्णय घेत संभाजीनगर असे नामकरण केले. मात्र त्यास केंद्राची मान्यता बाकी होती. नुकत्याच सत्तेवर आलेल्या शिंदे गट- भाजपाच्या सरकारने औरंगाबादच्या नामकरणाबाबत निर्णय घेत “छत्रपती संभाजीनगर” असे नामकरण केले. त्यास केंद्रानेही मान्यता दिली. त्यामुळे अखेर अनेक वर्षाच्या या प्रयत्नांना यश आले. मात्र काही संघटनांनी त्यास विरोध केला. त्यामुळे नामकरणाचा हा विषय चांगलाच तापला. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात हा विषय चर्चेचा बनला. याच पार्श्वभूमीवर बजाजनगर येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर नामकरनाच्या समर्थनार्थ सकल हिंदू एकत्रिकरण समितीची बैठक बुधवारी (ता.14) रोजी सायंकाळी झाली.
या बैठकीत छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ परिसरातील प्रत्येक नागरिकांनी “होय संभाजीनगरच पाहिजे” असे घोषणापत्र भरून त्यावर स्वाक्षरी करून समर्थन देण्याचा संकल्प केला. या स्वाक्षरी मोहिमेला वाळुज औद्योगिक वसाहत परिसरात सुरुवात झाली असून छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनात हिंदू समाज बांधवांनी छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मोठी वज्रमूठ बांधली आहे.
या बैठकीला पदाधिकारी कार्यकर्त्यांसह परिसरातील हिंदू समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
