March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.22) – स्वच्छता कर्मचारी व ठेकेदारास मारहाण केल्याची घटना वाळूज परिसरातील साऊथ सिटीत सोमवारी (ता.22) रोजी सकाळी घडली. या प्रकरणी दोघांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सिडको वाळूजमहानगरातील साऊथसिटीत सोमवारी ,(ता.22) रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास स्वच्छता कर्मचारी साफ-सफाई व कचरा संकलन करत होते. सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास सिडकोकडून स्वच्छता करण्याचा ठेका घेतलेले ठेकेदार वाल्मीक नामदेव सोनवणे (34, रा.पडेगाव हे साऊथसिटीत स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी योगेश थोरात व कृष्णा बोबडे यांनी ठेकेदार वाल्मीक सोनवणे यांना तुम्ही बसुन पगार घेता, तुम्हाला काम करायला नको का, सिडको आम्हाला काही सुविधा देत नाही. असे म्हणत दमबाजी करीत शिवीगाळ केली. यावेळी ठेकेदार वाल्मीक सोनवणे व स्वच्छता कर्मचा-यांनी वाद घालणा-या योगेश थोरात व कृष्णा बोबडे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनी ठेकेदार सोनवणे यांना मारहाण केली. मारहाण सुरु असतांना स्वच्छता कर्मचारी नामदेव वाघ व रुक्मिणी वाघमारे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही थोरात व बोबडे यांनी हाता-चापटाने मारहाण केली. साऊथसिटीतील नागरिकांनी पोलीस ठाण्यात संपर्क करुन या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ गाठुन वाद मिटविला.
पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
स्वच्छता कर्मचारी व ठेकेदारास मारहाण झाल्याची माहिती मिळताच सिडको परिसरात स्वच्छतेचे काम करणारे जवळपास 45 स्वच्छता कर्मचारी घंटागाड्यासह एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात जमा झाले. मारहाण करणा-या दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी या स्वच्छता कर्मचा-यांनी करीत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. यानंतर स्वच्छता कर्मचा-यांनी जोरदार घोषणाबाजी करुन हल्लेखोराविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी लावुन धरली. या प्रकरणी ठेकेदार वाल्मीक सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन योगेश थोरात व कृष्णा बोबडे या दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *