March 25, 2026


बजाजनगर, (ता. 23) – सेवेत मोठे सामर्थ्य आहे. त्यामुळे सेवेचे महत्व ओळखा. पण भगवंत प्राप्तीसाठी सेवा कार्याला निस्सीम भक्तिची जोड द्या. संत एकनाथांनी संसार करून परमार्थ साधला. संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतानी श्रीखंड्याच्या रूपात दर्शन घडविले. हे संत एकनाथ महाराज यांच्या सेवावृत्तीचे व निस्सीम भक्तीचे प्रतीक आहे. संत एकनाथ महाराजांप्रमाणे आपणही सेवेला भक्तीची जोड दिली पाहिजे. असे आवाहन संतचरित्रकार हभप सागर महाराज काचोळे जवखेडा ता.कन्नड यांनी केले.

अपरा एकादशी निमित्त शुक्रवारी (ता.23) रोजी वाळूज महानगराचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात ह.भ. प. काचोळे महाराज यांचे हरिकीर्तन संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी संत एकनाथ महाराजांचा

‘मना तू एक करी /वाचे आठवी श्रीहरी/१/
आणिक न करी साधन/ वाचे म्हणे नारायण /२/
सर्वकाळ हाची धंदा /वाचे आठवी गोविंदा/३/
तेणे जीवा सोडवणं/ शरण एका जनार्दन/४/ ‘

हा अभंग कीर्तन सेवेसाठी घेतला होता. या अभंगाचे निरूपण करताना त्यांनी संत एकनाथ महाराजांच्या सेवावृत्ती व भक्तीचे उदाहरण देऊन विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले की, सेवेत मोठे सामर्थ्य आहे. सेवेला निस्सीम भक्तीची जोड दिल्यास भगवंत आपल्यावर निश्चितच कृपादृष्टी करतात. अशी ग्वाही यावेळी ह.भ. प. काचोळे महाराज यांनी दिली.

कीर्तनप्रसंगी आदर्श गाव पाटोदा येथील ग्रामविकासाचे शिल्पकार भास्करराव पेरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, आप्पासाहेब झळके आरोग्य कीर्तनकार डॉ एम डी संकपाळ यांच्यासह पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पहाटे सतीश विखे व विष्णू सोळुंके यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस महाभिषेक करण्यात आला. तसेच त्यांच्या तर्फे सर्वांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. या किर्तन सोहळा यशस्वितेसाठी मंदिर कमिटीचे चे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *