
वाळूजमहानगर, (ता.20) – वाळूजमहानगर-1 व 2 तसेच तिसगाव येथे लांब पल्याच्या बसेसला थांबा देण्यात यावा. अशी मागणी सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच नागेश कुठारे यांच्या नेतृत्वाखाली एसटीचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मंगळवारी (ता.20) करण्यात आली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर तिसगाव तसेच सिडको वाळूजमहानगर 1 व 2 चा परिसर आहे. या ठिकाणची लोकवस्ती जवळपास 50 हजार आहे. येथे सिडकोकडुन नगर-1 व नगर 2 ला बस थांबा सुध्दा बनविण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी लांब पल्याच्या बसेस थांबत नसल्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला, शाळेतील मुले यांना शिक्षणासाठी शहरात ये जा करावी लागते. येथे बस थांबत नसल्यामुळे मानसिक तसेच आर्थिक नुकसान होत असुन जास्तीचा वेळ सुध्दा जातो. त्यामुळे लांबपल्ल्याच्या बसेस या ठिकाणी थांबविण्याचे संबंधित सर्व आगार प्रमुख यांना तसे निर्देशित देऊन बस थांबविण्यात यावे. तसेच वाळुज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व कर्मचारी हे बजाजनगर, शरणापुर, करोडी, धरमपूर, पंढरपूर व ईतर लाखोंची संख्या पहाता या दोन बस थांब्याचा त्यांना सुध्दा लाभ होईल. शिवाय वेळ, रस्ता सुरक्षा तसेच आर्थिक नुकसान सुध्दा होणार नाही. त्यामुळे येथे लांब पल्याच्या बसेस थांब विण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपसरपंच तथा सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, उपाध्यक्ष नरेंद्रसिंग यादव, जेष्ठ नागरिक लक्ष्मण काकडे, अशोक मनाळ, प्रदिप डवाळकर, शरद ढवळे, कोंडीराम बाचकर, बाबुराव जसवंत, नारायण सोनवणे, जनार्दन रिंढे, भुजंग इंगोले, शिवनाथ काकडे उपस्थित होते.
