वाळूज महानगर, (ता 17) – सत्ता संघर्षासाठी सुरू असलेल्या जोगेश्वरी ग्रामपंचायतच्या महानाट्यवर सोमवारी (ता. 22) रोजी सरपंच आणि उपसरपंच पदासाठी शिक्कामोर्तब होऊन पडदा पडणार आहे. तत्पूर्वी सहलीवर गेलेले ग्रामपंचायतचे पदाधिकारी गुजरातेतील कुबेर भंडारीच्या दर्शनाचा आनंद घेत आहे. 
जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच पदाच्या निवडीला अवघे काहीच दिवस उरले असून सहलीवर गेलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणखी एकाची भर पडल्याने बहुमताचा आकडा वाढून 11 वर पोहोचला आहे. दरम्यान सरपंच व उपसरपंच निवडी आधी देवदर्शन उरकून घेत असलेल्या सदस्यांचा फोटो वायरल होत आहे. 
तेलही गेले आणि तूपही –
जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच व उपसरपंचावर अविश्वास आणण्यासाठी अनेक दिग्गजांनी कंबर कसली. त्यासाठी एका राजकीय पक्षाचेही (सर्वच प्रकारचे) पाठबळ मिळविण्यात आले. परिणामी जोगेश्वरी ग्रामपंचायतचे महानाट्य अनेक महिने चांगलेच रंगले. यादरम्यान हमरीतुमरीवरून जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत मजल गेली. मात्र शेवटी जे व्हायचे तेच झाले. शिवसेनेच्या हातून सत्ता खेचण्यासाठी आखलेली रचना अखेर धुळीस मिळाली. आणि फोडण्यात आलेले ग्रामपंचायत सदस्य हातून निसटून पुन्हा तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांना मिळाले. त्यामुळे ‘तेलही गेले आणि तूपही’ अशी अवस्था सत्तातर घडवून आणण्याच्या मनसुब्यात असलेल्यांची झाली आहे. सोमवारी (ता.22) रोजी सरपंच व उपसरपंचाच्या पदावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणार आहे.
https://youtu.be/XuYInRi9tEs
मात्र जोगेश्वरीच्या या सत्ता संघर्षाच्या महानाट्याची वाळूज परिसरात खमंग चर्चा आहे.
