वाळूजमहानगर, (ता.17)) :- वाळूज परिसरातील जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव एकमेकांमधील धुसफूस व अपहरणनाट्यानंतर अखेर बहुमताने गुरुवारी (ता.16) रोजी पारीत झाला. यावेळी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत 16 जणांनी सहभाग घेतला. यात अविश्वास ठरावाच्या बाजूने 13, तर विरोधात 3 सदस्यांनी मतदान केले. सरपंच गजानन बॉबले गैरहजर होते.
जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या 17 सदस्यांपैकी 13 जणांनी एकत्र येत सरपंच गजानन बोंबले व उपसरपंच प्रवीण दुबिली यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.
या ठरावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (ता.16) रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठरल्यानुसार
तहसीलदार सतीश सोनी हे दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेला सुरुवात झाली. सभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा करून हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने योगेश दळवी, नजीरखॉ पठाण, प्रभाकर काजळे, प्रवीण थोरात, अनिल वाघ, मीना पनाड, हिरा सौदागर, शीला वाघमारे, योगिता आरगडे, शाईन शेख, भारती साबळे, रुक्मिणी काजळे व संगीता ठोकळ या 13 सदस्यांनी मतदान केले. तर विरोधात उपसरपंच प्रवीण दुबिले, सोनू अमोल लोहकरे व शांताबाई किशोर बिलवाल या 3 सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे हा अविश्वास ठराव 13 विरुद्ध 3 मतांनी पारित झाल्याचे जाहीर केले. ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांनी सहायक म्हणून काम पाहिले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त–
जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या या अविश्वास ठरावावर चांगलेच महानाट्य रंगले. दरम्यान काही सदस्यांचा अपहरण करण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे या विशेष सभेदरम्यान वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे व दंगा काबू पथकाचा चोख बंदोबस्त होता.
त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
