वाळूजमहानगर – सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र लाईटअभावी या कार्यक्रमावर परिणाम होतो. त्यामुळे सण उत्सवात लोड शेडिंग बंद करून सुरळीत लाईट ठेवा. नसता महावितरण कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गंगापूर तालुका अध्यक्ष काकासाहेब चापे पाटील यांनी वाळूज येथील महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता खंडागळे यांना दिलेल्या एका लेखी निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. पुढील काळात दसरा व दीपावली येत आहे. त्यामुळे सकाळी पाच ते दहा, दुपारी तीन ते पाच व सायंकाळी सहा ते आठ अशी दिवसातून तीन वेळा करण्यात येणारी लोड शेडिंग बंद करावी. व नागरिकांना सण उत्सवासाठी सुरळीत लाईट चालू ठेवावी. नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाळूज येथील महावितरणच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गंगापूर तालुका अध्यक्ष काकासाहेब चापे पाटील, गौरव आगाशी, सचिन पानखडे, पंकज वानखडे, तुकाराम कुराडे, कुणाल चोबे, गणेश थोरात यांनी दिला आहे.