
वाळूजमहानगर, ता.20 – बजाजनगर येथे कर्मयोगी संत गाडगे बाबां यांची 68 वी पुण्यतिथी शुक्रवारी (ता.20) रोजी स्वच्छता अभियान भजन गायन व अभिवादन अशा विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
श्री गुरुदेव सेवाश्रम व ग्रामगीता अध्ययन केंद्र बजाजनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर परिसरात सामूहिक श्रमदान करून करण्यात आला. याप्रसंगी मंडळाच्या सेवकांनी परिसराची स्वच्छता केली. यानंतर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाच्या वतीने सामुदायिक प्रार्थना व भजन सादर करण्यात आले. आरती व प्रसाद वितरणानंतर राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी गजानन मानकर, भानुदास पळसकर,राजु देशमुख,गजानन तुपसुंदर, प्रमोद देशमुख,विनोद माळवी,दिवाकर हुसनापुरे,नरेश देशकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ,श्री गुरुदेव महिला मंडळ ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळाचे सर्व पदाधिकारी व सेवकांनी परिश्रम घेतले.
