March 23, 2026

समाजप्रबोधन, आरोग्यसेवा आणि व्यावसायिक जबाबदारी यांचा सुंदर संगम


वाळुज महानगर, (ता.27) – फार्मासिस्ट या आरोग्य सेवेशी निगडित व्यावसायिकांच्या भूमिकेची महत्ता अधोरेखित करणाऱ्या जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या वर्षीचा थीम “Think Health, Think Pharmacists” असून, त्यानुसार आरोग्य निर्णय घेताना फार्मासिस्टच्या सल्ल्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यामार्फत करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. संतोष शेळके, आणि प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शेळके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “फार्मासिस्ट हा केवळ औषधे देणारा कर्मचारी नसून तो समाजाचा आरोग्यदूत आहे. औषधांचे योग्य ज्ञान, त्याचा प्रभाव, डोसचे नियोजन, आणि रुग्णांना आवश्यक त्या सल्ल्याचे महत्व सांगणारा हा आरोग्य व्यवस्थेतील अनिवार्य घटक आहे.”


जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात खालील उपक्रम राबवण्यात आले
आरोग्य रॅली – विद्यार्थ्यांनी शहरातील विविध भागांतून जनजागृती रॅली काढून फार्मासिस्टच्या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. “आरोग्य रक्षक – फार्मासिस्ट” अशा घोषणांनी वातावरण भारले गेले.
पोस्टर सादरीकरण स्पर्धा – औषधनिर्मिती, रोग प्रतिबंधक उपाययोजना, औषधांचा शास्त्रीय वापर, आणि फार्मासिस्टच्या विविध भूमिका यावर आधारित विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पक आणि माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेने प्रेक्षकांची मने जिंकली.
नाटिका (Skit) स्पर्धा – विद्यार्थ्यांनी फार्मासिस्टच्या सामाजिक आणि व्यावसायिक भूमिकेवर आधारित लघुनाटिकांची सादरीकरणे केली. या माध्यमातून त्यांनी रुग्ण-फार्मासिस्ट संवाद, औषध दुष्परिणाम, सल्ला व मार्गदर्शन यावर प्रकाश टाकला.
घोषवाक्य (Slogan) लेखन स्पर्धा – फार्मासिस्टच्या कार्याची महती सांगणारी घोषवाक्ये विद्यार्थ्यांनी तयार केली. “आरोग्यासाठी मार्ग – फार्मासिस्टचा सल्ला आवश्यक” यांसारखी घोषवाक्ये उठून दिसली. राज्यस्तरीय Reels Making स्पर्धा विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फार्मासिस्टची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणाऱ्या आकर्षक reels तयार केल्या. आरोग्य विषयक माहितीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर झाला.
छायाचित्रण (Photography) स्पर्धा आरोग्य, फार्मसी आणि जनजागृतीवर आधारित फोटोग्राफी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यातून विचार मांडले.
सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्यांनी केवळ शैक्षणिक पातळीवर नव्हे तर सामाजिक बांधिलकीचा भान ठेवून सहभाग घेतला. शिक्षक, प्राध्यापक, आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडला.

जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करणे ही औपचारिकता नसून, आरोग्यसेवेत फार्मासिस्टची भूमिका समजून घेण्याचा व समाजात ती रुजवण्याचा एक गंभीर आणि सकारात्मक प्रयत्न आहे.
श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीचा हा उपक्रम म्हणजे आरोग्य शिक्षण, व्यावसायिक कौशल्य आणि सामाजिक भान यांचा त्रिवेणी संगम होता. भविष्यातील आरोग्यसेवेतील जबाबदार व्यावसायिक घडवण्याच्या प्रक्रियेत या कार्यक्रमाने मोलाची भर घातली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *