
वाळुज महानगर, (ता.29)- शेताच्या बांधावरून उगले आणि दुबिले कुटुंबात काठी, लाकडं, विळा व कुऱ्हाडीने तुंबळ हाणामारी झाल्याने दोन्ही कुटुंबातील 6 जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता.28) रोजी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागापूर येथे घडली. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अकुंश भावराव उगले, वय 60, रा.नागापुर, यांनी मे 2023 मध्ये सचिन सुधाकर जोशी यांची नागापूर शिवारातील शेत गट नंबर 71 मधील 1 हेक्टर जमीन खरेदी केली. जमिनीच्या उत्तरेस बाळु शेषराव दुबिले यांची शेत जमीन (गट नंबर 73) आहे. त्यांनी जमीनीच्या फेरफारावर आक्षेप घेतलल्याने त्यावर तहसीलदाराने उगले यांच्या बाजुने आदेश दिला आहे. गुरुवारी (ता.28) रोजी अंकुश उगले यांचा मुलगा शुभम हा सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास शेतात गेला असता बाळु दुबिले व राहुल दुबिले हे सामाईक बाध नांगरत होते. ही माहिती फोनवरून शुभमने सांगितल्याने अंकुश उगले, भीमाबाई उगले व परमेश्वर उगले शेतात गेले. यावेळी त्यांचा शेताचा बांध नांगरण्यावरून वाद होऊन काठी, लाकडं, विळा व कुऱ्हाडीने तुंबळ हाणामारी झाली. अंदाजे सव्वा अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत उगले कुटुंबातील अकुंश भावराव उगले, वय 60, भिमाबाई अकुंश उगले, वय 52, शुभम अकुंश उगले, वय 26, परमेश्वर अकुंश उगले, वय 29 तर दुबिले कुटुंबातील बाळू दुबले व त्यांचा मुलगा असे सहा जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वाळुज ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक एस ए दिलवाले यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ रवाना केले. याप्रकरणी अंकुश उगले यांच्या जबाबावरून वाळुज पोलीस ठाण्यात आरोपी बाळु दुबिले, राहुल दुबिले, दत्तात्रय दुबिले, निर्मला दुबिले व संगीता दुबिले यांच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे करीत आहे.
