
वाळुज महानगर, (ता.20)- बजाजनगर येथील शिवछत्रपती विद्यालयात मार्गदर्शन, पोवाडे, प्रश्नमंजुषा, नृत्य नाटिका, जिवंत देखावा, वेशभूषा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन सोमवारी (ता.19) रोजी शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मनोगत व्यक्त केले. तसेच पोवाडे, नृत्य व स्वराज्याच्या शपथीचा जिवंत देखावा आदी कार्यक्रमाचे सादरीकरण उत्कृष्टपणे केले. यावेळी बालशिवाजीच्या वेशभूषेतील छोटे-छोटे विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 
या प्रसंगी मुलांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यात मुलांना छ. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. मुलांनीही यामध्ये आनंदाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर जाधव तर अध्यक्ष म्हणून शाळेच्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका विद्या भोसले यांची उपस्थिती लाभली. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा राजमाने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक अमोल चव्हाण, गणेश लोंढे, नागेश कदम, सारिका चांडोळे, स्वाती शिरसाठ, पुनम शर्मा, अश्विनी करंजे, अर्चना भगत, विजया चौधरी, प्रतिभा काळे, लक्ष्मी बोरीकर, मुक्ता चव्हाण व अश्विनी गोराडे यांचे सहकार्य लाभले.
