March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.24)- बजाजनगर येथील शिवछत्रपती विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘जल्लोष चिमुकल्यांचा’ हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरामध्ये 21 जानेवारी रोजी मोठ्या उल्हासात, आनंदात व जल्लोषात झाला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिक्षण उपसंचालक डॉ.अनिल साबळे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून देवगिरी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन किशोर शितोळे व प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती दशरथ मुळे आणि कैलास गव्हाण यांची उपस्थिती लाभली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या भोसले, शाळेचे उपाध्यक्ष मधुकर जाधव, शाळेचे सदस्य संजय भोसले, सचिन चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित होते.


प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वतीच्या प्रतिमेचे, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांनी शिक्षण संस्थेच्या कार्याचा वार्षिक अहवाल मांडला.

वार्षिक स्नेहसंमेलन ‘जल्लोष चिमुकल्यांचा’ या कार्यक्रमात विविधतेत एकता ही थीम ठेवण्यात आली होती. या अनुषंगाने काश्मीर, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र व तमिळनाडू आदी भारतातील विविध राज्यांतील लोकनृत्य व देशभक्तीपर गीतावर शाळेतील बालवर्ग -1 ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी बहारदार अशा पेहरावात उत्साहात नृत्याचे सादरीकरण तसेच श्रीरामाचे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतलेली स्वराज्याची शपथ यांच्यावर आधारित नाटिका व गीतांवर नृत्याविष्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक गणेश लोंढे, विजया कोळी, सारिका डोंगरे व रेवती तायडे यांनी केले. पाहुण्यांचे आभार नागेश कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक अमोल चव्हाण, संध्या ढवळे, स्वाती शिरसाठ, सुरेखा राजमाने, पुनम शर्मा, अश्विनी करंजे, मंगल पाटील, अर्चना भगत, विजया चौधरी, प्रतिभा काळे, लक्ष्मी बोरीकर, मुक्ता चव्हाण व अश्विनी गोराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *