
वाळूज महानगर, (ता.25) – शेतीचा व्यवहार ठरल्यानंतर इसारपावती सुद्धा करून दिली. त्यापोटी रोख व आरटीजीएस प्रमाणे रक्कमही घेतली. मात्र ठरल्याप्रमाणे शेती नावावर न करता ती परपस्पर विक्री करून एका वाळू व्यवसायकाची 8 लाख 50 हजार रुपयाची फसवणुक केली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पितापुत्रा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्ञानदेव तुकाराम पाटोळे (वय 69) वर्ष रा. वडगाव कोल्हाटी यांचा वाळू विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी जवळी बुद्रुक ता. कन्नड येथील नानासाहेब काशिनाथ शिनगारे व विशाल नानासाहेब शिनगारे यांची गट नंबर 39 मधील 58 आर शेती 30 लाख रुपयात खरेदी करण्याचे ठरवून तशी ईसार पावती केली. आणि 20 जानेवारी 2025 रोजी रजिस्ट्री करण्याचे ठरले. दरम्यान शिनगारे यांनी पाटोळे यांच्याकडून रोख रक्कम व आरटीजीएस प्रमाणे वेगवेगळ्या तारखेत 8 लाख 50 हजार रुपये घेतले. 
ठरल्याप्रमाणे शेतीची रजिस्ट्री करण्यासंदर्भात पाटोळे यांनी शिनगारे यांना वेळोवेळी विचारले असता आजउद्या असे करून चाल ढकल केली. दरम्यान शिनगारे पिता पुत्राने पाटोळे यांना शेतीची इसार पावती करून देऊन सुद्धा ती शेती परस्पर राजेश बाळू शिनगारे आणि रेखा बंडू दळवी यांना विक्री केली. आणि ज्ञानदेव पाटोळे यांची 8 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी पितापुत्रा विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अरविंद शिंदे करीत आहे.
