वाळूजमहानगर, (ता.31) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्ही येथे सन 2022- 23 या वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झाले. या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी आपले विविध कलागुण सादर केले. यामध्ये दारूबंदी, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन अशा वेगवेगळ्या विषयावर अप्रतिम नाटिका, देशभक्तीपर गीते, मनोरंजन गीते सादर करून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष कैलास किसनराव पवार यांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करून कार्यक्रमाला 11 हजार रुपये, आणि उपसरपंच दादासाहेब चांगदेव मगर यांनी 5 हजार रुपये बक्षीस दिले. कोल्ही गावच्या सरपंच उषाताई म्हस्के, उपसरपंच दादासाहेब चांगदेव पाटील ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपट डगळे, उपाध्यक्ष जीवन गोरे, झुंबर पवार व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
गावकऱ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मुलांवर बक्षिसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमासाठी एकूण 36 हजार 313 रुपये जमा झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला मिसाळ, पदवीधर शिक्षक महेश कमोदकर, सहशिक्षक केशव चव्हाण, वृषाली कुलकर्णी, सुजाता कोठुळे आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या सर्वांची कोल्ही गावचे सरपंच आणि शालेय समिती अध्यक्ष, सदस्यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव चव्हाण यांनी केले. तर महेश कमोदकर यांनी आभार मानले.
