वाळूजमहानगर, ता.29 – विटावा येथील जिल्हा परिषद शाळेच्या गेट समोर साप निघाल्याने विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली. मात्र मुख्याध्यापक व उपसरपंच यांच्या सतर्कतेमुळे सर्पमित्राच्या सहकार्याने सापाला पकडून शुक्रवारी (ता.27) रोजी जंगलात सोडून देण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विटावा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अचानक नाग जातीचा साप निघाला. शाळेतील दोन मुलांनी शाळेच्या गेटवर साप पाहताच त्यांनी मुख्याध्यापक यु के बक्षी यांना माहिती दिली. त्यामुळे बक्षी यांनी तात्काळ विटावाचे उपसरपंच अण्णासाहेब गांगर्डे यांना माहिती दिली. कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता गांगर्डे यांनी तात्काळ सर्पमित्र दत्ता जाधव व लक्ष्मण गायके (मामा-भांजे )यांना पाचारण केल्याने त्यांनी शाळेकडे धाव घेत सुरक्षित रित्या 5 फूट सापाला पकडले. त्यावेळी सर्पमित्र मामा भांजे यांनी विद्यार्थ्यांना सापाबद्दल माहिती देताना सांगितले की, हा नाग जातीचा विषारी साप आहे. साधारणतः 5 ते 7 फुटापर्यंत याची लांबी असते. हा दिसायला तपकिरी, पिवळसर, राखाडी आणि काळ्या रंगात आढळतो. डोक्याचा भाग मोठा, नाकपुड्या मोठ्या, डोळे काळे व मोठे. फण्याच्या आतील बाजुस दोन काळे ठिपके दिसतात. व फण्यामागे मोडी लिपीतील 10 चा आकडा दिसतो. बेडूक, उंदीर, सरडे, क्वचित प्रसंगी छोटे साप हे याचे खाद्य आहे. एप्रिल ते मे दरम्यान मादी 18 ते 25 अंडी घालते. गवताळ भागात, शेतीत, वारुळांमध्ये, पडक्या घरात तसेच जंगलांमध्ये याचे वास्तव्य असते. हा पकडलेला नाग दौलताबाद वन विभाग अधिकारी आर. एस. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याला त्याच्या आदिवासात जंगलात सोडून देऊ. अशी माहिती सर्प मित्र मामाभांजे यांनी दिली. यावेळी विटावाचे उपसरपंच आण्णासाहेब गांगर्डे, शाळेचे मुख्याध्यापक यू के बक्षी, गणेश फड, गणेश बर्डे, विशाल पावशे, संकेत गोळे, सरला जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश जाधव, सुभाष फोटकाडे, सरला पोटफाडे, मुकेश वाचेवार, एन डी कोकरे, एम आर डोळस, पी आर खैरनार यांची उपस्थिती होती.
सर्पदंशाची लक्षण –
नाग चावल्याने दंशाच्या जागेवर बधीरपणा येतो, सुज येते, गुंगी यायला लागुन तोंडातून लाल गळू लागते. नाडी मंद होऊन हृदयाचे ठोके वाढतात. व उलट्या होतात. डिवचला गेला असता फणा काढतो. फणा काढून शत्रुला घाबरवणारा हा एकमेव साप आहे. हे याची वैशिष्ट्य आहे.