वाळूजमहानगर, ता.3 – वाहतूक ठप्प झाल्याने ती सुरळीत करत असलेल्या वाहतूक शाखेच्या एका हवालदाराला दुचाकीवर आलेल्या दोघांनी शिवीगाळ करून कॉलर पकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील एनआरबी चौकात गुरुवारी (ता.2) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अशोक उत्तमराव थोरात, (वय 54), रा. सिडको महानगर -1, व पंडित कांदे असे दोघे वाळूज औद्योगिक वसाहतीतील एनआरबी चौकात गुरुवारी (ता.2) रोजी वाहतूक नियमन करत होते. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हॉटेल कार्तिकी समोर वाहतूक ठप्प झाल्याने पोलीस हवालदार अशोक थोरात हे वाहतूक सुरळीत करीत असताना एचएफ डीलक्स या दुचाकी (एम एच 20, एफ एच- 9422) वर दोन तरुण आले. त्यांनी हवालदार थोरात यांना ‘ए भाडया, तु काय काम करतो तुला मागे काय? जाम झाले दिसत नाही का? असे बोलून दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या नामदेव लक्ष्मण खंबाट याने थोरात यांच्या डोक्यात असलेले हेल्मेट ओढुन काढले. त्यानंतर दुचाकी चालवणा-या अंकुश रामदास आहेर याने व खंबाट या दोघांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की करत शर्टाचे कॉलर पकडून शासकीय गणवेश फाडला. तसेच तु काय काम करतो, आम्हांला माहिती आहे. तुम्हांला फक्त पैसे घ्यायचे कळते. असे बोलून खाली पाडून लाथा बुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक उत्तमराव थोरात, (वय 54), रा. सिडको महानगर -1, फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमावाने बेदम चोपले –
दरम्यान घटनास्थळी जमलेल्या लोकांनी दोन्ही आरोपींच्या तावडीतून पोलीस हवालदार अशोक थोरात यांना सोडवून आरोपींना पकडून हाताचापटाने व लाथा बुक्यांनी मारहाण बेदम चोपले. दरम्यान घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
पोलिसांची घटनास्थळी धाव –
वाहतूक शाखेच्या हवालदाराला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पो.उपनि. शंकर सिरसाठ, पोलीस हवालदार केशव इघाटे आदींनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना दुचाकीसह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.