
वाळूजमहानगर : वाळूजमहानगरातील सात गटात धक्कादायक निकाल लागला. पालकमंत्री संयज शिरसाठ यांच्या विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या चार गटात अपक्ष आल्याने शिवसेनेला मोठी चपराक बसली. वडगाव बजाजनगर मध्ये उबाठाचे पुर्ण पॅनल तर दुसऱ्या गटात अपक्ष तर दोन्ही गणात शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले. तर पंढरपुर येथे गट व गणात उबाठा तर एका गणात राष्ट्रवादीने वर्चस्व निर्माण केले. रांजणगाव व अंबेलोहळ गटात गणात भाजपाने निर्वीर्वाद वर्चस्व प्रास्थापीत केले. विशेष म्हणजे वाळूज गटात राष्ट्रावादी अप पक्षाच्या उमेदवाराने बाजी मारून आमदार प्रशांत बंब यांना धक्का दिला.

वडगाव बजाजनगर गट 50 ललिता सुरेश सोनवणे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत एनवेळेवर शिवसेना उबाठा मध्ये प्रेवश करून उमेदवारी मिळवली. प्रतिस्पर्धी उमेदवार तथा सरपंच सुनिल काळे यांच्या भावजई रक्षंदा शुभम काळे यांच्यावर मात करत 1 हजार 877 मताची आघाडी घेत दणदणीत विजय मिळविला. तर तसेच गणात त्याच पॅनलचे दत्तात्रय वर्पे व सतिश हिवाळे यांनी बाजी मारली. 
वडगाव बजाजनगर मध्ये पश्चिम गट 51 मध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपा पुरुस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड वरचढ ठरले असून त्यांचा अवघ्या एक मताने विजय झाला. तर याच गणात शिवसेनेचे बाळासाहेब गाढे व रत्नमाला ढमढेरे यांनी विजयश्री खेचून आणली. पंढरपुर गटात माजी सरंपच शेख अक्तर व महेंद्र खोतकर यांनी शिवसेनेत प्रवेश करीत सारिका खोतकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे माजी जि प सदस्य रमेश गायकवाड यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांनी शिवसेना उबाठा उमेदवारी मिळवीत 2 हजार अधिक मतधिक्याने घेत दुसऱ्यांदा वर्चस्व राखण्यात यश मिळविले. 
पंढरपुर गणात त्याच पॅनलच्या लताबाई साईनाथ कानडे विजयी झाल्या. तर गेवराई मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे अनुराग शिंदे यांनी विजय मिळविला. तर दोलताबाद गटात लंका जाधव यांनी तर दोलताबाद गणात सर्जेराव चव्हाण यांनी भाजपाची उमेदवारी मिळवली. यांच्या विरोधात महाविकास अघाडी उमेदवार नसल्याने त्यांची थेट लढत एमआयएम सोबत झाली. यात गटात व गणात भाजपा उमेदवारांनी 6 हजार 722 मताची आघाडी घेत तर दोलाबाद गणात दणदणीत विजय मिळविला. मात्र तिसगाव गणात चौरंगी लढत पहायला मिळाली यात शिवसेनेच्या सुनंदा अडसुळे या विजयी झाल्या.
एका मताची किंमत कळली –
बजाजनगर गट क्रमांक 51 येथे शिवसेना शिंदे गटाचे हनुमान भोंडवे व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांच्यात चांगलीच लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत सचिन गरड यांना एक मत अधिक पडले. त्यामुळे येथे पुन्हा मतमोजणी करण्यात आली. मात्र मतांच्या संख्येत काहीही फरक पडला नाही. त्यामुळे अवघ्या एका मताने सचिन गरड यांचा विजय झाला. या एका मताची किंमत दोन्ही उमेदवारांना लाख मोलाची वाटली. या एका मताची किंमत सर्वांनाच कळली. त्याची चर्चा सलग दोन दिवस वाळुज महानगरात सुरू होती.

वाळुजमध्ये बंब यांना धक्का, शिवसेनेचे पारडे जड
वाळूज येथे शिवसेना भाजपा युती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व उबाठा गट युती, एम आय एम तसेच वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत झाली.
या अत्यंत चुरशीच्या लढाईत आमदार प्रशांत बंब यांना जोरदार धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बालाजी सोनटक्के यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे वाळुज गटातील लिंबे जळगाव गण व वाळूज गण या दोन्हीही ठिकाणी शिवसेनेने बाजी मारली. येथे लिंबे जळगाव गणातून मंगलाताई डॉ. ज्ञानेश्वर निवड व 
वाळुज गणातून ज्योती संतोष आरगडे यांनी विजयश्री खेचून आणली. मात्र एमआयएम व वंचित बहुजन आघाडी अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेले.
