वाळूजमहानगर, (ता.21) – जैन धर्माचे शाश्वत तीर्थक्षेत्र समेद शिखरजी (पारसनाथ तीर्थ) ला झारखंड सरकार व केंद्र सरकारने पर्यटन क्षेत्र घोषित करण्याचा निर्णय घेतला. याचा निषेध म्हणून वाळूज येथे सकल जैन समाजाच्या वतीने व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून बुधवारी (ता.21) रोजी मूक मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले.
झारखंड राज्यातील समेद शिखर हे जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला झारखंड राज्य सरकार व केंद्र सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लहान उद्योगांना चालना देण्यासाठी मछली व कुक्कुट पालनास चालना देण्याचे म्हटले आहे. परिणामी येथे मांस, मच्छी खाणाऱ्यांसह दारू पिणाऱ्यांची संख्या वाढेल, येथील अहिंसात्मक शाश्वत क्षेत्रात हिंसात्मक कार्य वाढेल. त्यामुळे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येईल. म्हणून जैन समाजाच्या वतीने झारखंड व केंद्र सरकारचा निषेध होत आहे.
याचाच एक भाग म्हणून वाळूज येथे बुधवारी (ता.21) रोजी सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी सर्व जैन समाजाची व्यापारी प्रतिष्ठाणे बंद होती. येथील झेंडा मैदानातून निघालेला हा मूक मोर्चा जैन स्थानक मार्गे गणेश चौक, मुख्य महामार्गाने जाऊन पोलीस ठाण्यात गेला. तेथे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांना निवेदन देण्यात आले. व सकल जैन समाजाच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन मुकेश बोहरा, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन समितीचे पारसचंद साकला, अँड योगेश बोहरा, अँड विलास पाटणी, महेश गंगवाल, नितीन लोहाडे, सुनिल गंगवाल, योगेश बोहरा, नीरज साकला, मनोज संकलेचा, काकासाहेब चापेपाटील, रतन गंगवाल, अशोक गंगवाल, दीपक पाटणी, अनिल लोमटे यांच्यासह सकल जैन समाजाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने या मूक मोर्चा सहभागी झाल्या होत्या.
