
वाळूज महानगर (ता.13) – छत्रपती संभाजीनगर व वाळूज महानगरातील बहुतांश गावाचा समावेश वैजापूर आरटीओ कार्यालय हद्दीत करण्यात आला आहे. यामुळे वाहनधारक-नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी वाळूज महानगरचा भाग करोडी येथील कार्यालयात वर्ग करण्यात यावा. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे विश्वगती मोटर चालक मालक ट्रान्सपोर्ट अससोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे परिवहन प्रादेशिक अधिकारी कोमटूळे यांना गुरुवारी 11 डिसेंबर रोजी विश्वगती मोटार चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मुकेश मंगरुळे, गोकुळ तुपे, युवराज मोगल, गणेश महामुनी यांनी दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर पश्चिम 431136 या पिन कोडच्या गावांचा समावेश करोडी येथे करावा. तसेच या भागातील वाहनधारक व नागरिकांना होणारा त्रास दूर करावा. आर्थिक खर्च व कामासाठी रोजंदारी बुडत असून, वैजापूर येथे तब्बल 60 किमी जावे लागत आहे. या नवीन नियमावलीमुळे अनेकांतून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अनेकांना रोजगार बुडवून कामाला दांडी पडत आहे. यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला आर्थिक झळ बसत असून, अनेकांतून नाराजी व्यक्त केली आहे. नागरिक व वाहनधारकांची होणारी ही गैरसोय तात्काळ दूर करावी. अशी विनंती वजा मागणी करण्यात आली आहे.
