वाळूजमहानगर, (ता.29) – भगवान गौतम बुद्धांचा अस्थीकलश घेऊन परभणी येथून चैत्यभूमी (मुंबई)कडे निघालेल्या थायलंड येथील 110 जणांच्या भिक्खू संघावर फुलांची उधळण करत या धम्म पदयात्रेचे वाळूज परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका यांनी अभूतपूर्व स्वागत केले.
गगन मलिक फाउंडेशन इंडिया, भारतीय बौद्ध महासभा व आश्रेय फाउंडेशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बौद्ध धम्मपद यात्रेच्या स्वागतासाठी ए एस क्लब ते बोधिसत्व ध्यानसाधना केंद्र, तिसगाव हा रस्ता रांगोळी व फुलांनी अक्षरशः सजला होता. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थी असलेला अस्थीकलश घेऊन थायलंड येथील पु.धम्मगुरु लॉंगफुजी यांच्या मार्गदर्शनाखाली 110 बौद्ध भिक्खुसह भारतीय भिक्खू आणि उपासक-उपासिका परभणीहुन चैत्यभूमी (मुंबई) कडे धम्मपदयात्रे निघाले आहे.

या धम्म पदयात्रेचा वाळूज परिसतील तिसगाव येथे शुक्रवारी आणि शनिवारी रात्री मुक्काम होता. ही धम्म पदयात्रा बोधिसत्व ध्यानसाधना केंद्र तीसगाव येथे येताच अस्थीकलश रथावर व भिक्खू संघावर फुलांची उधळण करीत उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. ध्यानसाधना केंद्र येथे ही यात्रा दाखल झाल्यानंतर भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पु.भन्ते सॉंगगसेन यांची धम्मदेसना झाली. तिसगाव येथील बोधिसत्व ध्यानसाधना केंद्र येथे दोन दिवस मुक्कामी असलेली ही धम्मपदयात्रा रविवारी (ता.29) रोजी सकाळी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली.
अस्थीकलश दर्शनासाठी गर्दी –
तिसगाव येथील बोधिसत्व ध्यानसाधना केंद्र येथे भगवान गौतम बुद्धांच्या अस्थीकलश दर्शनासाठी शहरासह वाळूज परिसरातील नागरिकांची अलोट गर्दी झाली होती.
पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले उपासक-उपासिका, अबाल, वृद्ध यांनी शांततेत व मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले.
