वाळूजमहानगर – वाळुज औद्योगिक वसाहतीतील तिरंगा चौक ते गुडइयर टायर आणि बजाजनगर येथील रहिवासी अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन या रस्त्यांचे काम करण्यात यावे. अशी मागणी वाळूज औद्योगिक वसाहतीसह परिसरातील कामगार, कर्मचारी, अधिकारी व नागरिक यांच्या मधून होत आहे.
वाळुज, पंढरपूर, रांजणगाव, जोगेश्वरी, विटावा, घानेगाव, करोडी, साजापूर अशा विस्तीर्ण पसरलेली वाळूज औद्योगिक वसाहत आहे. आशिया खंडातील सर्वात महत्वाची वाळूज एम.आय.डी.सी. असून या ठिकाणी लहान मोठे दोन हजाराचे पुढे कारखाने असून लाखो कामगार येथे काम करतात. रात्रंदिवस चालणाऱ्या या कारखान्यांमध्ये कामगारांना 1 ली पाळी, 2 री पाळी, 3 री पाळी अशा तीन पाळी (शिफ्ट) मध्ये कामावर कंपनीमध्ये जावे लागते. परंतु येथील रस्त्यांमुळे कामगारांचे प्रचंड हाल होत असून दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्यात यावे. अशी मागणी होत आहे.
या रस्त्याची झाली दुरवस्था –
वाळुज औद्योगिक वसाहतीतील तिरंगा चौक ते गुडइयर टायर या रस्त्यावरील एन आर बी कॉर्नर ते रांजणगाव फाटा, बजाजनगर या रहिवासी क्षेत्रातील अंतर्गत रस्ते प्रामुख्याने महाराणा प्रताप चौक, हायटेक काँलेज, तसेच चौक मोरे चौक ते जागृत हनुमान मंदिर. या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे.
या कारणांमुळे झाली रस्त्याची दूरवस्था –
याबाबत वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीचे अधिकारी म्हणाले की, पंढरपूर ते जोगेश्वरी पर्यंत अशी विस्तीर्ण वाळुज औद्योगिक वसाहत आहे. मात्र या रस्त्यात साचणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी असे चित्र नेहमीच पहावयास मिळते.
प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी –
पाऊस पडल्याने रस्त्यावर खूप पाणी जमा होते. त्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागतात. त्यात अनेक वाहन बंद पडतात व वाहतूक कोंडी होऊन मोठी रांग लागते. कामगार व कर्मचाऱ्यांच्या या समस्यांची दखल घेऊन एमआयडीसी प्रशासनाने येथे साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा कसे करता येईल. याचे नियोजन करावे.
छावा संघटनेचा आंदोलनाचा इशारा –
वाळुज औद्योगिक वसाहतीतील व बजाजनगर येथील रस्त्याबाबत अखील भारतीय छावा संघटनेने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन रस्त्याची दखल घेऊन त्वरित काम सुरू करावे. नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मोहनराव मार्कंडे पाटील, जिल्हा उपअध्यक्ष, नवनाथ काळे, तालुकाध्यक्ष पश्चिम गिरीधर चव्हाण, वाळूज महानगर अध्यक्ष योगेश सोनवणे, मनोहर सनेर पा., दिनेश आमगे, भैय्या पाटील, भालचंद्र निकम, योगेश गोरे, प्रविण गावंडे, अमोल निमसे, अमोल काकड, योगेश निलंगेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.