
वाळूजमहानगर,(ता.11) – वाळूज औद्योगिक वसाहतीत मोकळ्या जागा गिळंकृत करणे, दिवसेंदिवस वाढणारे अतिक्रमण व दारू, मटका अशा अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असल्याने वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योग धंद्यासह कामगारांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन होणारे दुष्परिणाम तात्काळ थांबवावे. अशी मागणी समोर येत आहे.
गेल्या काही दिवसापासून वाळूज औद्योगिक वसाहतीतील अवैध धंद्याने कळस गाठला आहे. शिवाय दररोजच्या मारामाऱ्या, प्राण घातक हल्ले व घातपात अशा घटना घडत आहे. शिवाय मोकळे भूखंड, हरीत पट्टे हडप करण्यासाठी अनधिकृतपणे पुतळे बसवण्यात येत आहे. त्यातून मुरूम चोरीचे प्रकार होत असल्याने वाळूज औद्योगिक परिसरातील वातावरण कलुषित होत आहे. असाच प्रकार प्लॉट क्र. ई-11, एम.आय.डी.सी. वाळुज येथील कंपनीसमोर झाला आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. ई-11, रांजणगाव फाटा एम.आय.डी.सी. वाळुज येथे मे. ए. व्ही. मेटे या नावाने प्लास्टीक ग्रॅन्युअल्स् मॅन्युफेक्चेरिंग व वुडन पॅलेटचा व्यवसाय मागील 25 वर्षापासून आहे. या कंपनीच्या समोर काही व्यक्तींनी अहिल्याबाई होळकर यांचा अनाधिकृतरित्या पुतळा बसवला आहे. व जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती एमआयडीसी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय यांना कंपनीच्या वतीने एका लेखी पत्राद्वारे दिली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. काही दिवसांपासून वाळूज एमआयडीसी एरियात समाजकंटकांनी जागा हडपण्याचा, चोरुन मुरुम विकण्याचा सपाटा लावलेला आहे. तसेच रांजणगाव फाटा येथे एमआयडीसी कार्यालयाने तात्पुरत्या भाडेकरारनाम्यानुसार झुणका भाकर केंद्र चालविण्यास दिले असता सदर व्यक्ती करारनामा संपुन देखील त्या ठिकाणी दारू विक्री व गुटका विक्री करीत आहे. त्यामुळे कामगार वर्गावर दुष्परिणाम होत आहे. असा आरोप कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.
