वाळूजमहानगर, (ता.23) – प्लॉट विकण्यापूर्वी सर्व सुविधांनी युक्त असा डंका बजावला. मात्र आता सुविधा न देता वाऱ्यावर सोडल्याने वाळुज येथील हनुमान नगरातील नागरिक विविध नागरी समस्यांसाठी त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे या भागात गेल्या तीन दिवसापासून विद्युत वायर नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे तीन दिवसापासून येथे अंधाराचे साम्राज्य आहे.
वाळुज येथे हनुमाननगरची निर्मिती गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी झाली. येथील प्लॉट त्वरित विकल्या जावे म्हणून संबंधित प्लॉट विक्री करणाऱ्यांनी खरेदीदारांना विविध आमिष दाखवले. रस्ते, लाईट, पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याचेही दाखवण्यात आले. मात्र या सुविधा दर्जेदार नसल्याने प्लॉट खरेदी करून घर बांधणाऱ्यांना विविध समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच मोठा मनस्तापही होत आहे.
नव्यानेच निर्माण झालेल्या या नागरिक वसाहतीत विद्युत पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली विद्युत केबल नादुरुस्त होण्याचे प्रकार वारंवार वाढले आहे. त्याचे कारण म्हणजे केबल दर्जेदार नसणे. गेल्या तीन दिवसापासून हनुमाननगर येथे विद्युत पुरवठा बंद आहे. म्हणून येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीत धाव घेत एका निवेदनाद्वारे आपली कैफियत मांडली. यावेळी विजय राजगिरे, प्रदीप जाधव, किरण धारे, पंढरीनाथ शिंदे, सुधीर चव्हाण, सय्यद रिहान, खाजा शहा, भिकन चव्हाण, अमीन शेख, संतोष मोरे, अमन पठाण, अनंत पाटील, अरुण जैस्वाल आदींची उपस्थिती होती.
ग्रामपंचायतचे हातवर –
हनुमाननगर येथील रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज लाईन आदी विविध समस्या संदर्भात येथील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे धाव घेतली असता ग्रामपंचायतने हात वर करत ज्याच्याकडून प्लॉट घेतले त्या मालकाला जाऊन भेटा, त्याच्याकडूनच काम होईल. असे सांगितल्याचे नागरिक म्हणतात.
हनुमाननगर येथे सर्वसामान्य कामगार वर्ग राहतो. या कामगारांनी पै पै जमा करून प्लॉट घेऊन घरं बांधली. मात्र आता त्यांना विविध नागरी समस्यांचा सामनावा करावा लागत असल्याने नागरिक खूपच त्रस्त झाले आहेत.
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे परिसरात अनेक बिल्डरांनी प्रस्थ मांडले आहेत. हे बिल्डर परिसरात प्लॉटिंग करून सुविधा न देता प्लॉट विकून गल्ला भरतात. त्यानंतर तेथे नव्याने अस्तित्वात आलेल्या नागरी वसाहतीत समस्यांचा पाढा सुरू होतो. आणि त्याचा नाहक बोजा ग्रामपंचायतवर येतो. त्यामुळे साहजिकच बिल्डरांनी न दिलेल्या सुविधांचा बोजा ग्रामपंचायतवर पडतो. त्यामुळे या प्लॉटिंगला मंजुरी देण्यापूर्वी ग्रामपंचायतीने लाख वेळा विचार करण्याची वेळ आली आहे.
