March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – ट्रकमधून आलेला गुटखा इतर वाहनात घालून विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी छापा टाकून प्रतिबंधित गोवा गुटखा व एक ट्रक, तीन एस यु व्ही कार, एक आयशर टेम्पो व तिन दुचाक्या असे आठ लहान मोठ्या वाहनासह जवळजवळ एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (ता.25) रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास लिंबे जळगावजवळ करण्यात आली. या मुद्देमालाचा ऐवज वाळूज पोलीस ठाण्यात मावेनासा झाला.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा लिंबे जळगाव परिसरात ट्रक मधून आला असून तो इतर वाहनातून चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जाण्यात येणार आहे. या माहितीवरून पोलिसांनी लिंबे जळगाव परिसरात सैलानी बाबा दर्गाजवळ सापळा रचला. तेथे काही वेळाने एक टाटा ट्रक (एम एच 12, एफ सी -8835) आला. त्यातील गुटखा आरोपी प्रभाकर किसन सोळुंके (34) रा. लिंबे जळगाव ता. गंगापूर, संदीप कल्याण शेंडगे (27) रा. बापूनगर रांजणगाव (शेणपुंजी), सुनील जयराम ढोले (33) रा. टेंभापुरी, योगेश वाल्मीक पवार (24) रा. टेंभापुरी, दत्तू सुभाष पाटेकर (27) रा. तूर्काबाद हे उतरवून तो एक आयशर टेम्पो, तीन कार व तीन चाकी द्वारे वाहतूक करण्याच्या प्रयत्नात होते. त्याच वेळी पोलिसांनी छापा टाकून आरोपीसह गुटखा व त्यांची वाहने असा एकूण 95 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त केला. दरम्यान ट्रक चालक व मुख्य आरोपी शेख सद्दाम शेख महेबुब रा. झेडपी गेट वाळूज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा पोलिसांच्या हातावर तुरी देत घटनास्थळावरून फरार झाला.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप गुरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, पोलीस हवालदार योगेश नवसारे, संजय नंद, परभत म्हस्के, अविनाश ढगे, विजय भानुसे, मनोहर गीते, संतोष भानुसे, नितीन देशमुख, दादासाहेब झारगड यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *