
वाळुज महानगर, (ता.17) – विनापरवाना गाईंची कत्तल करून गोवंशीय मांस कार मधून वाहतूक करणाऱ्यांना वाळूज पोलिसांनी सतर्क गोरक्षकाच्या मदतीने सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातील दीड लाख रुपये किमतीचे गोमांस व चार लाखाची इनोव्हा कार असा एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वाळूज पोलिसांनी बुधवारी 17 डिसेंबर रोजी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास टोलनाका, लिंबेजळगाव ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर येथे केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथून एका कार मधून गोमांस वाहतूक होणार असल्याची माहिती सतर्क गोरक्षकांनी वाळूज पोलिसांना डायल 112 वर दिली. या माहितीवरून वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश लक्क्स, पोलीस हवालदार जगताप, विकास जाधव, खाकरे यांनी लिंबे जळगाव येथील टोल नाक्यावर सापळा रचला. बुधवारी 17 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास एक पांढ-या रंगाची टोयोटा इनोव्हा कार (एम एच 04, डी डब्ल्यू-5204) अहिल्यानगरकडुन वाळुज टोलनाकाकडे येत होती. परंतु पोलिसांना पाहून गाडी चालकाने यु-टर्न करुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना थांबविले. त्यावेळी चालक इनोव्हा कार सोडुन पळुन गेला. तेव्हा तेथे जमलेल्या जमावाने इनोव्हा कारची तोडफोड केली. त्यात एका काळया रंगाचे ताडपत्री मध्ये मांस भरलेले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ गो-रक्षक रिवकुमार पाठे, कडुबाळ पाटेकर यांच्या मदतीने कार व त्यातील साजीद राजु सय्यद (वय 40 वर्ष) रा. ममदापूर ता. राहता जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.
पाहणी करून पोलिसांनी केला पंचनामा –
गोरक्षक व पोलिसांनी पकडलेली कार व गोमांसची पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांनी दोन पंचासमक्ष पाहणी केली. त्यात जनावराचे कापलेले मांस होते. कार मधील साजिद सय्यद याच्याकडे मांस व इनोव्हा याबाबत चौकशी केली असता ही कार अतिक कुरेशी रा. ममदापूर ता. राहता जि. अहिल्यानगर याची असुन त्यानेच ममदापूर येथे गाई कापुन त्याचे मांस छत्रपती संभाजीनगर शहरात विक्री करण्याकरीता पाठविल्याचे सांगीतले. तसेच त्यांच्याकडे मांस वाहतुकीचा परवाना नसल्याने पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे यांनी दोन पंचासमक्ष इनोव्हा चारचाकी कार व त्यातील मांस याचा पंचनामा केला
साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त –
सदर वाहनात असलेल्या मांसातुन डी.एन.ए. तपासणी कामी नमुने संकलीत करण्यासाठी पशु चिकीत्सक, ता. गंगापुर यांना पाचारण करण्यात आले त्यांनी सदर मांसाचे पाहणी करुन ते मांस हे गो मांस असल्याचे सांगुन सदर मांसातुन तपासणी कामी नमुने संकलित करुन उर्वरीत मांस जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे अंदाजे 500 किलो वजनाचे गोवंशिय मांस, 4 लाख रुपये किंमतीची पांढ-या रंगाची टोयोटा कंपनीची इनोव्हा कार (एम एच 04, डी डब्ल्यू-5204) चा समावेश आहे.
तीन जणांविरुद्ध गुन्हा –
याप्रकरणी पोलिस अंमलदार गणेश कैलासराव लक्क्स यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी इनोव्हा कार चालक जुनेद (पुर्ण नाव माहिती नाही) रा. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर, गो मांस वाहतूक करणारा साजीद राजु सय्यद (वय 40 वर्ष) रा. ममदापूर ता. राहता जि. अहिल्यानगर व मालक अतिक कुरेशी रा. ममदापूर ता. राहता जि. अहिल्यानगर यांच्या विरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात कलम 325 भारतीय न्याय संहिता, सह महाराष्ट्र प्राणी संवर्धन अधिनियम कलम 5, 5 (क), 9 (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
