
वाळुज महानगर, (ता.25) – वाळूज परिसरातील खवड्या डोंगराजवळ सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी सोमवारी 22 डिसेंबर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकत चार महिलांची सुटका करून दोघांवर कारवाई केली. ज्या पत्र्याच्या शेडमध्ये हा गोरखधंदा सुरू होता त्यावर गुरुवारी 25 डिसेंबर रोजी जेसीबी फिरवण्यात आले.
पंढरपूर येथील आरोपी शेख फरीद शेख सांडू याने तीसगाव ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण करून हे दोन खोल्यांचे पत्र्याचे शेड बांधले होते. तेथे पंढरपूर येथीलच कडूबाई भिकन पवार ही 70 वर्षीय महिला वेश्या व्यवसाय चालवत होती. या वेश्याव्यवसायावर सोमवारी पोलिसांनी कारवाई केली होती. चर्चेचा विषय ठरलेल्या या अतिक्रमणावर पोलिस संरक्षणात गुरुवारी 25 डिसेंबर रोजी जेसीबी फिरवण्यात येऊन अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी लालचंद कासुरे, कमलसिंग सूर्यवंशी, माजी सरपंच संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गायकवाड, दिनेश तरैय्यावाले, जितू जाधव, शेख शाईन आणि जेसीबी चालक कारवाईला उपस्थित होते.
