February 5, 2026

वाळुजमहानगर,(ता 31) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील हात मोजे बनवणाऱ्या कंपनीस रविवारी (ता.31) भल्या पहाटे 12.30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका कुत्र्यासह सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटे पाच पर्यंत सुरू असलेली ही आग सहा बंबाच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रणात आणली. दरम्यान काही कामगारांनी झाडावर चढून उड्या मारल्याने या आगीतून बालंबाल बचावले. यात ते किरकोळ जखमी ही झाले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर 216 मध्ये साबेर शब्बीर शेख रा. किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर यांची सनशाइन इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. या कंपनीत हात मोजे बनवण्याचे काम केल्या जाते. या कंपनीत बिहार येथील असमुद्दिन मुस्ताक शेख हे ठेकेदार आहेत. ठेकेदारासह त्यांची पत्नी इसमत परवीन शेख, मुलगा मोहम्मद मुजमीन शेख, मुलगी आयेशा शेख यांच्यासह 18 कामगार काम करत होते. बिहार राज्यातील असलेले हे कामगार कंपनीतच राहत होते. शनिवारी रोजी काम संपवून सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर रविवारी (ता.31) भल्या पहाटे 12.30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. त्यावेळी सर्वजण झोपलेले होते. गर्मट व आगीच्या झळा लागल्याने काही कामगार झोपेतून उठले आणि बाहेर पळाले. पाहता पाहता ही आग भडकल्याने सहा कामगार आत मध्येच अडकले. त्यांच्याबरोबर एक पाळीव कुत्रा सुद्धा होता. बाहेर येण्याचा मार्ग बंद झाल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. सुमारे तीन तास अडकून पडलेले हे कामगार आगीच्या भक्षस्थानी सापडले. आग लागल्याची माहिती मिळताच वाळुज अग्निशमन दलाचे 2 बंब, बजाज ऑटोचा 1, मनपाचा 2 व चिकलठाणा अग्निशमन दलाचा 1 अशा एकूण 6 बंबांसह वाळुज एमआयडीसी पोलिसांनीनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान 108 च्या 4 रुग्णवाहिका आल्या. एक बाजू वगळता सर्व बाजूने बंदिस्त असलेल्या या कंपनीतील आग जास्तच भडकल्याने अथक परिश्रम करून अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवण्याचे काम केले. तोपर्यंत जवळजवळ साडेतीन तास उलटले होते. तरीही आग सुरूच होती. प्रथम आत मध्ये अडकून पडलेल्या सहा कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. एक कुत्राही या आगीत होरपळून मृत्यूमुखी पडला. सर्व मयत कामगारांचे मृतदेह घाटी दवाखान्यात रवाना करण्यात आले. काम करणाऱ्यांमध्ये बिहार राज्य, मधुबली जिल्हा, ठाणा मदनिया, पोस्ट मिर्झापूर, पंचायत दलोकर या गावाचे आहेत. त्यातील 1 पश्चिम बंगाल व 1 शेजारच्या गावातील आहे.

 सहा कामगार मृत्युमुखी
आग लागली तेव्हा तेथे राहणारे सर्वजण कंपनीमध्ये झोपलेले होते. आग लागल्याची चाहूल होताच अनेकांनी बाहेर पळ काढला. दरम्यान बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने मुस्ताक शेख (65), कौसर शेख (32), इक्बाल शेख (18), ललन सिंह (55), रियाज शेख (32) व मरगुल शेख (33) असे एकूण 6 कामगार आत मध्येच अडकून पडले. या आगीत होरपळून ते मृत्युमुखी पडले.

         पाच कामगार बालंबाल बचावले –
कंपनीला भीषण आग लागल्याने आणि बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग बंद झाल्याने कंपनीच्या वरच्या रूम मध्ये झोपलेले अली अकबर जाहिद हुसेन (28), मोहम्मद अफरोज आलम (23), मोहम्मद हैदर अली (32), मोहम्मद इरशाद व दिलीपकुमार चंद्रिकाकुमार (29) हे कामगार भयभीत झाले. आगीच्या झळा त्यांना सहन होत नसल्याने जीव वाचवण्यासाठी ते लगतच्या झाडावर चढले आणि खाली उड्या मारल्या. त्यामुळे ते बालंबाल बचावले.

 108 चे शर्तीचे प्रयत्न –
वाळुज औद्योगिक वसाहतीत आग लागून अनेक कामगार अडकल्याची माहिती मिळताच वाळूज पोलीस स्टेशन – डॉ. सुशील राऊत, पायलट मंगल राठोड, जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्र – डॉ. अनंत पाटील, पायलट मुसा शेख, भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र – डॉ विशाल आगळे, पायलट नितीन लांडगे, बन्सीलालनगर येथील 108 रुग्णवाहिकेचे- डॉ. काळे, चंदन राजपूत
व सिल्क मिल्ल – डॉ. हर्षल कोठारी, फहीम खान हे 108 रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धावले. या डॉक्टर आणि पायलटने शर्तीचे प्रयत्न करत आगीत होरपळलेले व जखमींना घाटीत दाखल केले.
शेजारच्यानी केली धावपळ-
वाळूज औद्योगिक वसाहतीतील ज्या सनशाइन कंपनीला आग लागली त्या कंपनी शेजारी असलेल्या हिना इंडस्ट्रीजचा कामगार गंगाधर कदम यांनीही आग प्रथम पाहिली. त्यामुळे त्यांनी धावपळ करत अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच थेट अग्निशमन दलाचे कार्यालय गाठून त्यांना सोबत घटनास्थळी आणून कामगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
—————

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *