
वाळूजमहानगर, (ता.9) – हॉटेलमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या दोन हॉटेल मालक व चालक यांना वाळुज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून 61 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून बावीस वर्षीय महिलेची सुटका करून दोघांना अटक केली. वाळुज औद्योगिक परिसरातील कामगार चौकात हॉटेल अतिथी येथे ही कारवाई गुरुवारी (ता.9) रोजी सायंकाळी करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळुज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौक ते बी के टी कंपनी दरम्यान असलेल्या हॉटेल अतिथी येथे वेश्याव्यवसाय चालतो. अशी माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून बनावट गिऱ्हाईक पाठवला. ठरल्याप्रमाणे इशारा होताच पोलिसांनी तेथे छापा टाकला असता तेथे 22 वर्षीय महिला मिळून आली. तसेच काउंटरवर एक व त्याच्याजवळ एक असे दोन इसम मिळून आले. त्यातील कृष्णा सोमनाथ काळे वय 29 वर्ष रा.वडगांव (को.) ता.जि. छत्रपती संभाजीनगर हा
हॉटेल अतिथीचा मालक आहे. तर दुसरा विजय बाबासाहेब बरबडे वय 26, वर्ष रा. दिपकनगर पंढरपूर ता. जि. छत्रपती संभाजीनगर हा हॉटेल चालक आहे. यातील दोन्हीही हॉटेल चालक-मालक हे बावीस वर्षीय महिलेला काम देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह मोबाईल मिळून 61 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अंमलदार राजाभाऊ कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
