वाळूजमहानगर, ता.1 – वाळुज औद्योगिक व वसाहतीतील के सेक्टर मध्ये स्टेशनर्स अँड इंडस्ट्रियल सप्लायर्सच्या शॉपला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (ता.1) रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली.
वाळुज औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर के – 217 येथे शर्मा यांचे सलग तीन गाळे आहे. त्यापैकी एक गाळा दरक यांनी हार्डवेअर साठी तर दोन गाळे कासोडा येथील भरत भाऊसाहेब गुंडाळे यांनी भाडेतत्त्वावर घेतले आहे. या दोन्ही गाळ्यामध्ये भरत गुंडाळे यांचे श्री बालाजी स्टेशनर्स अँड इंडस्ट्रियल सप्लायर या नावाचे शॉप आहे. दिवाळीनिमित्त भरत गुंडाळे यांनी सायंकाळी दुकानाची पूजा करून घरी गेले असता सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास भरत गुंडाळे यांच्या शॉपला आग लागल्याचे शेजारील कंपनीच्या कामगारांनी पाहिले. या आगीची माहिती शॉप मालक भरत गुंडाळे व अग्निशमन दलासह पोलिसांना देण्यात आली. आगीची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.
मात्र तोपर्यंत भरत गुंडाळे यांच्या दुकानातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने शेजारील दोन्ही गाळ्याना या आगीची झळ पोचली नाही. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले. मात्र या आगीच्या घटनेत गुंडाळे यांचे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय शॉप चालक भरत गुंडाळे यांनी व्यक्त केला.