
वाळूजमहानगर, (ता.16) – वाळूज परिसरातील वडगाव को येथे मिठाईच्या दुकानाला आग लागून फर्निचर सह आतील साहित्य जळून खाक झाले. यात जवळजवळ पाच लाख रुपयाचे नुकसान झाल्याने दुकानदार हतबल झाला. ही घटना बुधवारी (ता.15) रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. ही आग शॉर्ट सर्किट होऊन लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव (को.) येथे अभय चोरडिया यांच्या मालकीचा दुकान गाळा खेमसिंग चव्हाण यांनी दीड वर्षापूर्वी भाड्याने घेतला. राजस्थान येथील खेमसिंग व जसवंत सिंग यांनी या गाळ्यात राजलक्ष्मी मिठाई नावाचे दुकान सुरू केले. त्यासाठी चोरडिया यांना प्रति महिना 13 हजार रुपये दुकान भाडे म्हणून देत होते. सर्व काही अलवेल असताना बुधवारी (ता.15) रोजी पहाटे 4 वाजेच्या राजलक्ष्मी मिठाई या दुकानाला आग लागली. आगीची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. या आगीत 42 हजार रुपयाचे एक डीप फ्रीज व 25 हजार रुपये किमतीचे दोन फ्रिज, एसी काउंटर, फर्निचर तसेच चिप्स व मिठाई यासह अन्य साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे दुकानदार हतबल झाले. यात अंदाजे 5 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे जसवंत सिंग यांनी सांगितले. आगीचे कारण निश्चित समजू शकले नसले तरी ती शॉर्ट सर्किट होऊन लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
