
वाळूजमहानगर, (ता.23) – मित्रामध्ये झालेल्या वादातून तीन जणांनी दोघांना कमरेच्या चामडी बेल्ट व लाकडी दांड्याने अमानुषपणे मारहाण करून 35 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता.23) रोजी पहाटे 2.15 ते 3.15 वाजेच्या दरम्यान वाळूज औद्योगिक वसाहतीतील कोल्हाटी साजापुर रोडवरील वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 70 प्लॉट नंबर 50, साई गार्डन हॉटेल येथे घडली. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साजापूर गोळीबार प्रकरण ताजे असतानाच खून केल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजू शेषराव मुरकुटे (35) सिडको वाळूज महानगर येथील सुरेश जैस्वाल यांच्या येस बॉस हॉटेलवर वेटर म्हणून काम करून तेथेच रहात होता. शुक्रवारी (ता.22) रोजी रात्री जेवण झाल्यानंतर राजू मुरकुटे आणि त्याच्यासोबत काम करणारा मित्र ज्ञानेश्वर देवरे हे मित्राला भेटण्यासाठी वडगाव कोल्हाटी साजापुर रोडवरील वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 70 प्लॉट नंबर 50, साई गार्डन हॉटेल येथे आले. त्यानंतर हॉटेल मधून तीन जण आले.
यावेळी राजू मुरकुटे, ज्ञानेश्वर देवरे, ओम बुळे, सागर ढवळे व अन्य एकजण यांच्यात वाद झाला. या वादामध्ये राजू व ज्ञानेश्वर यांना साई गार्डन हॉटेल मधील तिघांनी कमरेच्या चामडी बेल्टने तसेच लाकडी दांड्याने अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत राजू मुकुटे हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर ज्ञानेश्वर देवरे हा गंभीर जखमी आहे. ही घटना शनिवारी (ता.23) रोजी भल्यापहाटे 2.15 ते 3.15 वाजेच्या दरम्यान घडली. सकाळी या घटनेची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी गाव घेत जखमीला घटीत उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाचा शोध पोलीस घेत आहे.
याप्रकरणी मयताचा भाऊ गणेश शेषराव मुरकुटे यांच्या फिर्यादी वरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी ओम मुळे (23), सागर ढवळे (25) दोघे राहणार वडगाव कोल्हाटी. अंकुश मानकर (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव –
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साजापूर गोळीबार प्रकरण ताजे असतानाच दुसरा खून झाल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त महेद्र देशमुख, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह योगेश शेळके, राजाभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे, यशवंत गोबाडे आदिनी घटनास्थळी धाव घेतली.
मारहाणी नंतर उचलून नेले –
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राजू मुरकुटे व ज्ञानेश्वर देवरे यांना हॉटेलमधील तिघांनी उचलून हॉटेलच्या रूम नंबर 101 मध्ये नेले. तेथे मयताचा शर्ट, रक्ताचे डाग व चार दात पडलेले होते.
मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत –
शनिवारी पहाटे 2.15 वाजेच्या सुमारास राजू मुरकुटे व ज्ञानेश्वर देवरे हॉटेलमध्ये येतात. ते कोणाला तरी आवाज देतात. त्यानंतर पहिल्या मजल्यावरून तीन इसम खाली पार्किंगच्या मोकळ्या जागेत येतात. तिघेही दोघांना बेदम मारहाण करतात आणि उचलून रूममध्ये घेऊन जातात असे चित्र सीसीटीव्ही कॅमेरात आलेले आहे.
तर वाचला असता जीव –
हॉटेलच्या तीन जणांनी कमरेचा चामडी बेल्ट व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याने राजू मुरकुटे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारार्थ दाखल न करता हॉटेलच्या रूम नंबर 101 मध्ये उचलून नेण्यात आले. जर हॉटेलच्या रूम मध्ये न नेता उपचारार्थ दाखल केले असते तर राजू मुरकुटे याचा जीव वाचला असता.
