
वाळूजमहानगर, ता.7 (बातमीदार) – जळालेल्या विद्युत मीटरच्या बदल्यात दुसरे मीटर बसवून देण्यासाठी 5 हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने तीन जणांविरुद्ध बुधवारी (ता.7) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 64 वर्षीय तक्रारदाराच्या दोन मुलांच्या नावावर गुरुकृपानगर, गट क्रमांक-55, कमळापूर येथे असलेल्या घराचे व दुकानाचे जळालेले विद्युत मिटरच्या बदल्यात तक्रारदाराने उपलब्ध करून दिलेले दोन विद्युत मिटर बसवून देण्यासाठी वाळूज येथील वरिष्ठ तंत्रज्ञ शैलेश उत्तमराव जाधव यांनी खाजगी इसम दशरथ जगन्नाथ वाघमारे
याच्या मार्फतीने तक्रारदाराकडे बुधवारी (ता.7) रोजी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. व शैलेश जाधव यांनी सांगितल्यावरून बाह्य स्त्रोत कर्मचारी आसिफ कासम शेख याने स्वतः स्वीकारली.
याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी संगीता पाटील, पोलीस नाईक दिगंबर पाठक, पोलीस अंमलदार विलास चव्हाण यांनी केली.
