
वाळूजमहानगर, (ता.19) -वाळुज परिसरातून विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या दोन दुचाकी विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका रेकॉर्डवरील चोरट्याला पकडून त्याच्या ताब्यातून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (ता.18) रोजी बजाजनगर येथे करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शरद जिजाऊ बदाले वय 36 वर्ष रा. आर एम 97/4 जयभावानी चौक बजाजनगर यांची 60 हजार रुपये किमतीची हिरोहोंडा स्पलेंडर प्लस ही दुचाकी 24 डिसेंबर रोजी रात्री शिवाजी अंबादास वल्हे वय 53 वर्ष रा. गट नं.10 माऊलीनगर वडगाव (को.) छत्रपती संभाजीनगर यांचीही 55 हजार रुपये किमतीची हिरोहोंडा स्पलेंडर दुचाकी 8 जानेवारी रोजी कोणीतरी चोरून नेली होती. या दोन्हीही दुचाकी चोरी प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याचा तपास सुरू असताना गुरुवारी (ता.18) रोजी मिळालेल्या माहितीवरून चोरीची दुचाकी विक्रीसाठी दोन इसम आम्रपाली बौध्दविहार, बजाजनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तेथे छापा टाकून त्यास पकडले. त्याने त्याचे नाव विष्णु ज्ञानेश्वर सोनवणे वय 21 वर्ष रा. छत्रपतीनगर गल्ली नं.1, वडगाव (को.) ता.जि.छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले. तसेच दुचाकी चोरीची कबुली देऊन त्या विक्रीसाठी आणल्याचेही सांगितले. 1 लाख 15 हजार रुपये किमतीच्या या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. अटक केलेला आरोपी हा रेकॉर्डवरील वाहन चोर असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त नितिन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गणेश ताठे, सपोनि. गौतम वावळे, पोउपनि. दिपक रोठे, यशवंत गोबाडे, हनुमान टोके, राजाभाऊ कोल्हे, शिवनारायण नागरे, धिरज काबलिये, सुरेश भिसे यांनी केली.
