February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.8) – सर्व संतांचे साहित्य व बोधवचने श्रेष्ठ आहेत. कोणत्याही पंथ संप्रदायातील संतांनी रचलेल्या ग्रंथांचा उद्देश हा समाजाचे कल्याण होण्यासाठीच आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता हा अलीकडच्या काळातील सर्वांगीण मानवी जीवनाच्या विकासाचा दीपस्तंभ आहे. देश सुधारणे म्हणजे केवळ शहरांचा विकास करणे असा नव्हे, तर शहरांप्रमाणे भारतातील गावखेड्यांचाही विकास झाला पाहिजे. असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत वारंवार नमूद केले आहे. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ग्रामविकासाची योग्य दिशा दाखविणारा ग्रंथ आहे. म्हणून सर्वांनी ग्रामगीतेचे वाचन करावे आणि ग्रामगीते प्रमाणे आचरण करावे. असे आवाहन ग्रामगीताचार्य श्रीकृष्ण सावळे गुरुजी (अकोला) यांनी केले.

बजाजनगर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम ग्रामगीता अध्ययन केंद्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 57 व्या पुण्यतिथी निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगरच्या वतीने रविवार 7 डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सायंकाळी सावळे गुरुजी यांचे राष्ट्रीय किर्तन झाले.

यावेळी कीर्तनातून त्यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक व राष्ट्रीय क्षेत्रातील जीवन कार्याचे विस्तृत विवेचन केले. या कार्यक्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना उपस्थितांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी जीवनज्योती सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष व बजाज ऑटोचे सेवा निवृत्त अधिकारी चंद्रप्रकाश त्रिपाठी व सौ संतोष चंद्रप्रकाश त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळाचे पांडुरंग सरोदे, सुनील चोरे व वैशाली गवई आणि सहकाऱ्यांनी खंजिरी भजने सादर केले. सामुदायिक प्रार्थना, आरती, राष्ट्रवंदने नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सेवक व सेविकांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *